
खंडाळा येथील सिरियल किलर दुर्वास पाटील याने त्याच्या सायली देशी दारू बारमध्ये हत्याकांड घडवून आणले होते. तो सायली देशी दारू बार बंद करण्यासंदर्भात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी खंडाळ्यातील सायली देशी दारू बार सील केला आहे.
दुर्वास पाटीलने तीन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सायली देशी दारू बारमध्ये दुर्वास पाटीलने 55 वर्षीय सीताराम वीर यांना बेदम माराहाण केली होती. त्या माराहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुर्वास पाटीलने राकेश जंगम यांचा गळा आवळून खून केला. पहिले दोन खून पचल्यानंतर दुर्वासने प्रेयसी भक्ती मयेकर हिला खंडाळ्यातील सायली बारमध्ये बोलावून तिचा वायरने गळा आवळून खून केला. भक्तीचा मृतदेह दुर्वासने आंबा घाटातील दरीत टाकला. बेपत्ता भक्तीचा तपास करत असताना दुर्वासने केलेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला. ज्या सायली बारमध्ये हत्याकांड घडवून आणले तो बार सील करण्यासंदर्भातील अहवाल जिल्हा पोलीस दलाने उत्पादन शुल्क विभागाला पाठवला. त्या अहवालानंतर आज उत्पादन शुल्क विभागाने सायली बार सील केला.