रंगयात्रा – अंतर्मुख करणारं वॅनिटास स्टील लाईफ

>> दुष्यंत पाटील

डचांच्या या वैभवशाली काळातील क्लास नावाचा चित्रकार ज्याची चित्रं शांत, अर्थपूर्ण आणि अंतर्मुख व्हायला लावणारी असायची. त्याचं एक गाजलेलं चित्र म्हणजे ‘वॅनिटास स्टील लाईफ विथ अ स्कल अॅन्ड अ रायटिंग क्विल’. जे सध्या अमेरिकेमधल्या न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ या कलासंग्रहालयात आहे.

सतराव्या शतकाचा पूर्वार्ध हा डच लोकांचा वैभवशाली काळ होता. या काळात नेदरलँड्स (डच लोकांची भूमी) युरोपमधील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. त्यावेळचं नेदरलँड्स आजपेक्षा वेगळं होतं. इथे त्यांची जहाजं दूरच्या देशांतून मसाले, रेशीम आणि सोनं घेऊन येताना दिसायची. शहरं वाढत होती आणि लोक सुंदर घरं बांधत होती. पण या काळाला दुसरी बाजूही होती. त्या काळात विज्ञानाची प्रगती आजच्या इतकी झाली नव्हती. त्यामुळे बरेचशे आजार जीवघेणे ठरायचे. युद्धंही चालू असायची. लोकांचं आयुष्यमान कमी होतं. पण एक चांगलं जीवन जगायचं ते प्रयत्न करत. डचांच्या या वैभवशाली काळात कलाकार मंडळींना चांगले दिवस आले. लोकांकडे भरपूर पैसे असल्यानं चित्रं विकत घेऊन आपली घरं सजवणं ही या काळात एक सामान्य बाब होती. लोक आपल्या विचारांशी मिळतेजुळते विचार दर्शवणारी चित्रे विकत घेणे पसंत करायचे.

डच मंडळींच्या या सुवर्णकाळात क्लास नावाचा चित्रकार होऊन गेला. क्लासची खासियत म्हणजे तो चित्रांसाठी युद्धं, राजेमंडळी अशा गोष्टींऐवजी सामान्य लोकांच्या जीवनातले विषय निवडायचा. त्यामुळे त्याच्या चित्रांमध्ये जेवण, मेणबत्त्या, पुस्तकं, संगीतवाद्यं यांसारख्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी यायच्या. त्याच्या चित्रांमधल्या वस्तू इतक्या हुबेहूब असायच्या की, बऱयाचदा लोक चित्राला स्पर्श करून पाहायचे! क्लासची चित्रं शांत, अर्थपूर्ण आणि अंतर्मुख व्हायला लावणारी असायची. तो आपल्या चित्रांमध्ये भडक रंग वापरायचा नाही. त्याच्या चित्रांत सहसा फिकट तपकिरी, राखाडी रंगांच्या छटा दिसायच्या. यामुळे त्याची चित्रं शांत आणि गंभीर वाटायची. क्लासचं एक गाजलेलं चित्र म्हणजे ‘वॅनिटास स्टील लाईफ विथ अ स्कल अॅन्ड अ रायटिंग क्विल’. त्यानं हे चित्र 1628 मध्ये रंगवलं. ‘वॅनिटास’ हा चित्रकलेतला एक खास प्रकार आहे. ‘वॅनिटास’ हा शब्द लॅटिन भाषेतून आलाय. या शब्दाचा अर्थ ‘पोकळपणा’ किंवा ‘गर्व/अहंकार’ असा होतो. ‘वॅनिटास’ प्रकारातली चित्रं लोकांना आठवण करून देतात की सौंदर्य, संपत्ती यांसारख्या गोष्टीच नव्हे, तर ज्ञानसुद्धा चिरकाल टिकत नाही. ही चित्रं आपल्यासाठी खरोखर महत्त्वाचं काय आहे, याबद्दल विचार करायला लावतात.

क्लासचं हे चित्र स्थिरचित्रांच्या (स्टिल लाईफ) प्रकारात येतं. स्थिरचित्रं म्हणजे स्थिर वस्तूंची चित्रं. यात बहुतेक वेळा फळं, फुलं किंवा इतर वस्तू दाखवल्या जातात, पण प्रतिभावंत चित्रकार स्थिरचित्रांमधून स्थिर वस्तू दाखवताना त्यातून काहीतरी वेगळा अनुभवही देतात. क्लासही याला अपवाद नव्हता. तो आपल्या चित्रांमधून साध्या वस्तूंनाही गहन विचार करायला लावणारं रूप द्यायचा.

क्लासच्या या स्थिरचित्रात आपल्याला कवटी, पुस्तक, लेखणी, तेलाचा दिवा आणि एक काचेचा प्याला दिसतो. या वस्तू एकत्रितरित्या चित्राला खोल अर्थ देतात. यातल्या कवटीचा आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. कवटी आपल्याला प्रकर्षानं जाणीव करून देते की, माणूस कितीही श्रीमंत किंवा हुशार असला तरी तो एक दिवस मरणारच आहे. लेखणी आणि पुस्तकं म्हणजे ज्ञान, विद्वत्ता. कदाचित त्यांचा अर्थ काव्य आणि साहित्य असाही होऊ शकतो, पण त्यांच्या जवळ कवटी असल्यानं त्यांना एक वेगळा अर्थ प्राप्त होतो- ज्ञान खूप चांगलं आहे, पण विद्वान लोक, महान लेखकसुद्धा मरणापासून वाचू शकत नाहीत. चित्रात मद्य पिण्याचा प्यालाही पडलेला दिसतोय आणि पार्टी संपल्याचं दाखवतोय. हा प्याला आपल्याला सुख, मौजमजा आणि उत्सव यांनाही शेवट असल्याचं सुचवतोय. चित्रातल्या दिव्याची मंद, विझत चाललेली ज्योत संपत जाणारे जीवन दर्शवते. हा दिवा आपल्याला आठवण करून देतो की, जीवन सुंदर आहे, पण ते थोडय़ा वेळासाठी आहे. ते नक्कीच एक दिवस विझून जाणार आहे.

क्लासचं हे पेंटिंग सध्या अमेरिकेमधल्या न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ या कलासंग्रहालयात आहे. आजही म्युझियममध्ये येणारी मंडळी क्लासचं हे चित्र पाहिल्यावर क्षणभर स्तब्ध होतात. क्लासचं हे पेंटिंग अगदी छोटय़ाशा आकाराचं असलं तरी त्यातल्या खोल अर्थानं अजरामर झालंय!

[email protected]