पश्चिमरंग – प्रदर्शनातली चित्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दुष्यंत पाटील  

मसोर्ग्सकी आणि हार्टमन हे दोघं एकोणिसाव्या शतकातले रशियातले प्रसिद्ध कलाकार होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या पाच रशियन महान संगीतकारांनी एकत्रितरीत्या रशियन राष्ट्रीय संगीत पुढं आणण्याचा प्रयत्न केला. त्यात मसोर्ग्सकीचा समावेश होता.  

मसोर्ग्सकी आणि हार्टमन हे दोघं एकोणिसाव्या शतकातले रशियातले प्रसिद्ध कलाकार होते. मसोर्ग्सकी संगीतकार होता तर हार्टमन चित्रकार. दोघांनाही वाटायचं की, रशियन लोकांची राष्ट्रीय कला पुढं यावी, पाश्चात्त्यांचा त्यावर फारसा प्रभाव नसावा. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या पाच रशियन महान संगीतकारांनी एकत्रितरीत्या रशियन राष्ट्रीय संगीत पुढं आणण्याचा प्रयत्न केला. त्यात मसोर्ग्सकीचा समावेश होता.  

मसोर्ग्सकी आणि हार्टमन या दोघांची ओळख 1868 मध्ये झाली. त्यांची भेट स्टॅसोव्ह नावाच्या कला समीक्षकाच्या घरी झाली असावी असं मानण्यात येतं. स्टॅसोव्हला दोन्ही कलांमध्ये रस होता. ओळखीनंतर हार्टमननं आपल्याकडची दोन चित्रं मसोर्ग्सकीला भेट दिली, तर एकदोन वर्षांतच मसोर्ग्सकीनं आपली एक संगीत रचना हार्टमनला समर्पित केली.   

1873 मध्ये चित्रकार हार्टमन याचं अचानक निधन झालं. यावेळी त्याचं वय अवघं 39 होतं. त्याच्या निधनानं रशियन कलेचं नुकसान होणार होतं. आपल्या मित्राच्या निधनानं मसोर्ग्सकीला धक्का बसला. पुढच्या वर्षी म्हणजे 1974 च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये स्टॅसोव्हनं हार्टमनच्या जवळपास 400 चित्रांचं एक प्रदर्शन भरवलं. मसोर्ग्सकीला भेट दिलेल्या दोन चित्रांचाही या प्रदर्शनात समावेश होता. हे प्रदर्शन पाहायला मसोर्ग्सकी गेला होता. या प्रदर्शनातल्या आठवणी त्याच्या डोक्यात पुढचा बराच काळ घोळत होत्या.   

पुढच्या काही महिन्यांत मसोर्ग्सकी काही गीतांना संगीत देण्यात व्यग्र होता. आपल्या मित्राला संगीत रचनांमधून एक प्रकारे श्रद्धांजली वाहावी असं त्याला या काळात वाटत होतं. त्याला हार्टमनच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या आठवणी येत होत्या. जूनमध्ये त्यानं तीनच आठवडय़ांत प्रदर्शनातल्या चित्रांवर ‘झ्ग्म्tल्rाs at aह xिंप्ग्ंग्tग्दह‘ नावाचा एक संगीत रचनांचा संग्रह लिहिला. या साऱया रचना पियानोसाठी लिहिल्या गेल्या होत्या.   

या संग्रहात प्रदर्शनातल्या दहा चित्रांचं संगीत तर येतच होतं, पण याशिवाय प्रदर्शनात एका चित्रापासून दुसऱया चित्रापर्यंत चालत जातानाचंही संगीत येत होतं. हे संगीत पुन: पुन्हा येत होतं.   

‘जीनोम‘ नावाच्या चित्रावरची रचना या संग्रहात येत होती. ‘जीनोम‘ हे तिकडच्या कथांमध्ये येणारं एक पात्र आहे. हे पात्र बुटकं असून ते जमिनीखालच्या एखाद्या खजिन्याचं रक्षण करतं. हे पात्र काहीसं विचित्र असतं. स्टॅसोव्हच्या म्हणण्याप्रमाणं हार्टमनच्या चित्रातलं जीनोम थोडीशी विचित्र चाल असणारं होतं. मसोर्ग्सकीनं या चित्रावरच्या केलेल्या रचनेत हा विचित्रपणा जाणवतो. या रचनेची गती कधी मंदावते, कधी थांबते, तर कधी वाढते. त्यामुळं त्याची रचना ऐकताना जीनोमच्या विचित्र चालीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं.   

एका चित्रात मोठमोठी चाकं असणारी पोलंडची बैलगाडी दाखवण्यात आली होती. या चित्रावर केलेल्या संगीत रचनेत सुरुवातीला मोठय़ा आवाजातलं संगीत येतं. रचनेच्या शेवटी आवाज कमी कमी होत जातो आणि रचना संपते. बैलगाडी दूर जात जात दिसायची बंद होत असल्याचा भास ही रचना ऐकताना होतो.  एक रचना दोन यहुदी व्यक्तींच्या चित्रावर आधारित आहे. यातला एक यहुदी श्रीमंत, तर एक यहुदी गरीब होता. संगीत रचनेत दोन व्यक्तींसाठी दोन थीम्स येतात. एक थीम श्रीमंत व्यक्ती तर दुसरी गरीब व्यक्ती दर्शवते. रचनेच्या शेवटी दोन्ही थीम्स एकाच वेळी ऐकायला मिळतात.  

या रचनासंग्रहातल्या शेवटच्या दोन रचना सर्वात जास्त गाजल्या. यातली एक रचना होती ‘बाबा यागा‘ या पात्राशी संबंधित चित्रावर. या चित्रात हार्टमननं बाबा यागाची झोपडी घडय़ाळाच्या रूपात दाखवली होती. ‘बाबा यागा‘ ही रशियन कथांमध्ये येणारी एक प्रकारची चेटकीण आहे. या संगीतरचनेत घडय़ाळ्याच्या ठोक्यांची आठवण करून देणारं संगीत येतं. दुसरी रचना होती किएव्ह इथल्या भव्य प्रवेशद्वाराच्या चित्राची. किएव्ह म्हणजे आजच्या पोनची राजधानी. हार्टमन जसा चित्रकार होता तसाच तो वास्तुकलेतही पारंगत होता. चित्रात हार्टमननं दाखवलेलं किएव्हचं प्रवेशद्वार ही त्याची स्वतची रचना होती. मसोर्ग्सकीची रचना या प्रवेशद्वाराच्या भव्यतेची आठवण करून देणारं होतं.  हा रचनासंग्रह नंतरच्या काळात इतका लोकप्रिय झाला की, कित्येक लोकांनी या रचनांच्या ऑर्केस्ट्रासाठी अॅरेंजमेंट्स केल्या. यातली रॅव्हेल यानं केलेली अॅरेंजमेंट्स सर्वात जास्त गाजली. या रचनासंग्रहामुळं मसोर्ग्सकी विश्वविख्यात झाला. प्रदर्शनातल्या चित्रांवर केलेल्या संगीत रचना इतक्या लोकप्रिय का व्हाव्यात हे पाहण्यासाठी आपण या रचना एकदा तरी नक्की ऐकायला हव्यात.