
शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनेचा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा दसरा मेळावा सुरू केला. शिवतीर्थ व दसरा मेळावा ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेतील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात स्पष्ट केले.
जयंत पाटील सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनासाठी ते पुण्यात आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी त्यांचे मत मांडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दसरा मेळाव्याची परंपरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेतील असे ते म्हणाले. शिवतीर्थ व दसरा मेळावा हे एक शिवसेनेचे समीकरण आहे. ठाकरे ज्या बाजूला असतात तोच खरा दसरा मेळावा आणि येणाऱ्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होईल असे जयंत पाटील म्हणाले.

































































