
पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच आज दुपारच्या सुमारास अचानक हवामानामध्ये बदल झाला आणि कल्याण शहर व परिसरात धुळीचे वावटळ उठले. घोंघावणारा आवाज आणि हवेत पसरलेले धुळीकण यामुळे क्षणात समोरचे दिसेनासे झाले. धुळीच्या वादळाचा सुमारे पंधरा ते वीस मिनिटे तडाखा बसला. त्यातच सोसाटय़ाचा वारा व पावसाने नागरिकांची अक्षरश: दाणादाण उडाली. अनेक भागांतील घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली आणि वीजही गायब झाली. रस्त्यांवरील वाहनेही अचानक जागीच थांबली. धुळीचे लोटच्या लोट उसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, रायगडातील कर्जत, माथेरान, चौक तसेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यालादेखील अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. कर्जत, माथेरानमध्ये तर दीड तास धो धो पाऊस कोसळल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे, पालघर व रायगड जिह्यात सूर्य आग ओकत असून अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. वाढत्या उष्णतेला सर्वजण वैतागले असतानाच आज दुपारी कल्याणसह उल्हासनगर, ठाणे व परिसरात वावटळीमुळे ‘धूळ’धाण उडाली. प्रचंड मोठा आवाज तसेच अचानक आलेले वादळ यामुळे क्षणभर काय झाले हे कुणालाच कळले नाही. झोपडपट्टी तसेच चाळींच्या भागात तर धुळीच्या वावटळीने चांगलाच दणका दिला. वाळत घातलेले कपडेच काय, पण अनेक वस्तूही हवेत उडाल्या. रहिवाशांची पळापळ झाली. या वादळाचा वेग एवढा मोठा होता की, कल्याणच्या बिर्ला कॉलेजजवळ दोन झाडे घरांवर कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; पण घरांतील साहित्याचे नुकसान झाले. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील शेडच्या पत्र्यांचे अतोनात नुकसान झाले.
नेरळमध्ये ग्रामपंचायतीची लोखंडी कमान कोसळली
कर्जत, नेरळ, माथेरान तसेच कशेळे परिसरात तब्बल दीड तास अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. नेरळ पोस्ट ऑफिस परिसरातील सनी पॅलेस जवळ उभारण्यात आलेली ममदापूर ग्रामपंचायतीची जुनी लोखंडी कमान वादळी पावसामुळे कोसळली. सुदैवाने रहदारी नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.
माथेरानमध्ये मातीचा सुगंध आणि दाट धुके
– निसर्गरम्य माथेरानमध्ये आज निसर्गाचे वेगळेच रूप पर्यटकांना अनुभवता आले. अचानक आलेल्या पावसाने हवेत गारवा पसरला. तसेच मातीचा सुगंध आणि दाट धुके यामुळे वातावरण आल्हाददायक होते. पर्यटकांनी हा पहिला पाऊस चांगलाच एन्जॉय केला.
– उल्हासनगर महापालिकेच्या चौकातील भले मोठे झाड विद्युत वायरवर कोसळले. त्यामुळे पालिका मुख्यालयासह आजूबाजूच्या भागातील वीज बराच वेळ गायब झाली.
– सोसाटय़ाच्या वाऱयाने लग्नाच्या आनंदावरही पाणी फिरले. मुरबाड, कल्याण, चौक, कर्जतसह अनेक ठिकाणचे मंडप कोसळले. त्यावरील डेकोरेशनही भिजले.
– पालघर जिल्ह्यातील मोखाडा व परिसरात आज दुपारी तीननंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आंबा, काजू पिकांना मोठा फटका बसला. तसेच वीजपुरवठाही खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले.
वाहनांचे नुकसान
कल्याण पश्चिमेत वादळाने झाडे कोसळून तीन वाहनांचे अतोनात नुकसान झाले. गोदरेज हिल भागात तर वादळी वाऱयाने एवढे थैमान घातले की, रस्त्यावरील धूळ, माती, प्लॅस्टिकचा कचरा अनेकांच्या घरात गेला. दहा मिनिटे तर काही फुटांवरील इमारतीही दिसत नव्हत्या. रामबाग, शिवाजी चौक, खडकपाडय़ात दुकानदारांनी शटर बंद केले होते.
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे हेलकावे इमर्जन्सी लँडिंग
धुळीच्या वादळाचा तडाखा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरलादेखील बसला. मुरबाड येथे एका लग्नासाठी ते आज दुपारी साडेतीनच्या सुमारास महालक्ष्मी येथील हेलिपॅडवरून निघाले. त्यांच्यासोबत काही सहकारीदेखील होते. हेलिकॉप्टर ऐरोलीपर्यंत पोहोचताच पायलटला समोरून येणारे वादळ दिसले. प्रसंगावधान राखत त्याने तातडीने हेलिकॉप्टर माघारी वळवले व पुन्हा मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. काही वेळेतच शिंदे यांचे हेलिकॉप्टर जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुखरूप उतरले. पायलटच्या माघारी वळण्याच्या निर्णयामुळे मोठा गंभीर प्रसंग टळला.



























































