घालीन लोटांगण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

अॅडलेड कसोटीत हिंदुस्थानचा दुसरा डाव 36 धावांमध्ये उखडला जाणं हे भयाण स्वप्न होतं. सकाळचा योग आणि ब्रेकफास्ट संपण्याच्या आतच हिंदुस्थानचा डाव संपला होता. लिपस्टिक लावलेल्या ओठांसारखा गुलाबी चेंडू हिंदुस्थानी फलंदाजांच्या बॅटचे विषारी चुंबन घेत होता. पहिल्या डावातील 53 धावांच्या आघाडीचं महत्त्व क्षणात नष्ट झालं. कितीतरी जागतिक दर्जाचे फलंदाज आपल्या संघात खेळतात. विराट कोहली तर जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन दौऱयावर पुजाराने धावांच्या राशी उभ्या केल्या होत्या. घोरपडीलाही हेवा वाटावा इतक्या घट्टपणे विकेटवर चिकटून उभं राहण्याची त्याची ताकद आहे आणि अजिंक्य रहाणेने नेहमीच परदेशात धावा फटकावलेल्या आहेत. तरीसुद्धा हिंदुस्थानी संघ 36 धावांमध्ये गुंडाळणं जाणं ही अत्यंत भयानक अशी गोष्ट होती.

असेच एक भयानक स्वप्न माझ्या पिढीने 1974 साली अनुभवलं होतं. हिंदुस्थान त्यावेळेला  इंग्लंडविरुद्ध लॉर्डस्वर खेळत होता. इंग्लंडने पहिल्या डावात 629 धावा केल्या. त्यावेळेला खेळपट्टी अशी वाटत होती की, धावांची फॅक्टरीच तेथे वसवलेली आहे. डेनिस एमीस (188 धावा), माईक डेनीस (118 धावा) व टोनी ग्रेग (106) या तिघांनी शतकी प्रॉडक्शन केलं. बिचारा जॉन एडरीच कमनशिबी. तो 96 धावांवर बाद झाला होता. बेदी व प्रसन्नाने मिळून 116 ओव्हर्स टाकल्या. बेदीने सहा विकेटस् मिळवल्या, पण त्यासाठी त्याला 226 धावांचं मोल द्यावे लागले. हिंदुस्थानने प्रत्युत्तरादरम्यान 302 धावा केल्या (सुनील गावसकर (49), फारुख इंजिनीयर (86), अजित वाडेकर (18), गुंडाप्पा विश्वनाथ (52), ब्रिजेश पटेल (1), एकनाथ सोलकर (43). अर्थात हा प्रयत्न पुरेसा नव्हता. त्यामुळे इंग्लंडने फॉलोऑन दिला. खेळपट्टी मस्त होती. सूर्य तळपत होता. त्यांना असं वाटलं की, हिंदुस्थानी संघ दुसऱया डावात चांगले प्रत्युत्तर देईल. पण हिंदुस्थानी संघ 42 धावांमध्ये उखडला गेला. त्यात एकटय़ा सोलकरच्या नाबाद 18 धावा होत्या. त्यात त्याने एक षटकार ठोकला तो मरत मरत बाऊण्ड्रीच्या पलीकडे गेला. आजही मला आठवतेय, विजय मांजरेकर रेडिओवर कॉमेण्ट्री करत होते. आणि ते वैतागून म्हणाले, अरे तुमको हुक मारनेको नही आता है तो तुम क्यो मारता है’. हिंदुस्थानच्या पदरात प्रचंड नामुष्की पडली. पुढे सुनील गावसकरने आपल्या पुस्तकात असं म्हटलं होतं की, पाच उत्तम चेंडूंवर आमचे पाच महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. त्यामुळे 42 मध्ये आम्ही उखडलो गेलो. आता 36 धावांमध्ये उखडल्या गेलेल्या हिंदुस्थानी फलंदाजांना हेच बचावाचं कवच द्यायचं का? हे कवच तर कर्णधार कोहलीला अजिबात देता येणार नाही. तो आठव्या स्टम्पवरच्या चेंडूच्या पाठी लागला आणि बाद झाला. 42 धावांच्या नामुष्कीनंतर बरंचसं रामायण घडलं होतं. त्यानंतर हिंदुस्थानी संघाला इंडियन हाय कमिशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. हिंदुस्थानी संघ तिथे उशिरा पोहोचला. त्यामुळे त्यावेळचे हिंदुस्थानी हाय कमिशनर बी. के. नेहरू प्रचंड भडकले. ते कर्णधार वाडेकरला अद्वातद्वा बोलले. त्यांनी असंही म्हटलं, तुम्हाला बॅटिंग करता येत नाहीच, पण तुम्हाला वेळेवर कार्यक्रमालासुद्धा येता येत नाही. हे शब्द हिंदुस्थानी संघाला प्रचंड झोंबले. वाडेकर टीम घेऊन पुन्हा आपल्या बसमध्ये गेला. भडकलेली माथी थंड झाल्यानंतर वाडेकर आणि हिंदुस्थानी संघाची समजूत घालण्यात आली आणि हिंदुस्थानी संघ हाय कमिशनकडे परतला. पण एपंदरीत 42 धावांच्या नामुष्कीचे प्रचंड पडसाद त्यावेळेला उमटले. त्या काळामध्ये इंग्लिशमध्ये एक चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ‘समर ऑफ 42’. हिंदुस्थानच्या त्या परफॉर्मन्सला ‘समर ऑफ 42’ म्हटलं जायला लागलं. येथे हिंदुस्थानात क्रिकेट रसिकांमधला दुर्वासऋषी जागा झाला. त्याने वाडेकरच्या घरावर दगडफेक केली. इंदोरमध्ये 1971 साली एक बॅट उभारली होती. 1971 साली हिंदुस्थानने इंग्लंड व वेस्ट इंडीजला त्यांच्याच देशात हरवल्यानंतर त्या विजयाचा सन्मान म्हणून ती बॅट उभारली गेली होती. त्या बॅटवर डांबर फासलं गेलं. 42 धावांत ऑल डाऊन झालेली जखम पुढे बराच काळ भळभळ वाहत होती. त्या जखमेवर खपली धरायला अनेक वर्षे जावी लागली. तरीसुद्धा अधूनमधून ज्यावेळेस स्विंगसमोर हिंदुस्थानी फलंदाज नांगी टाकायचे, त्यावेळेस या जखमेवरची खपली निघायची. 36 धावांची ही जखम पुन्हा एकदा अश्वत्थामाची जखम ठरणार आहे का?

मला स्वतःला असं वाटतं की, हिंदुस्थानी क्रिकेटरसिक बऱयापैकी मॅच्युअर झालेला आहे. तो विध्वंसक काही करणार नाही. पण त्याचा राग कदाचित सोशल मीडियावर काढू शकतो. क्रिकेटमध्ये अशाच जखमा प्रत्येक देशाला जवळपास झालेल्या आहेत. त्यामुळे क्वचितप्रसंगी असं घडतंच. खेळाडूसुद्धा ही माणसचं आहेत आणि त्यांच्या हातून चुका होऊ शकतात. आणि ज्यावेळेला त्या एकत्रितपणे होतात तेव्हा असं पानिपत होतं. या घटनेमुळे 1974 च्या 42 धावांच्या जखमेची खपली पुन्हा एकदा निघाली.