
>> द्वारकानाथ संझगिरी
परवा ओल्ड ट्रफोर्डवरून मॅच संपल्यावर मी डॉ. रवी आपटे या मित्राकडे निघालो होतो. संध्याकाळी ट्राम गच्च भरली होती. एका तरुण मुलाने मला स्वतःची जागा दिली. इंग्लंडमध्ये असा ‘आदर’ अजून सर्वत्र दाखवला जातो. तो चक्क गप्पा मारायला लागला. बस-ट्रेनमध्ये पेपरात डोकं खुपसून बसणारं ‘पु.लं.’चं इंग्लंड आता बदलतंय. त्याने बोलता बोलता मला विचारलं, ‘क्रिकेटचा वर्ल्ड कप कुठे चाललाय?’ इतकं स्तब्ध मला कधी बायकोनेही केलेलं नाही. तो फुटबॉल फॅन होता. एकेकाळचा इंग्लिश खेळ इंग्लंडला किती परका झालाय हे कळतं.
आणि तो किती ‘आपला’ आहे हे ओल्ड टॅफोर्डवर कळत होतं. दुपारी मी स्टेडियमला एक फेरी मारली. स्वेटर किंवा जॅकेट न घालता. यावेळी मी पहिल्यांदाच फिरलो, इतकं मस्त ऊन होतं. आसपास फक्त हिंदुस्थानी होते. ढोल वाजत होते, पण ती पाकिस्तान मॅचची धमाल इथे नव्हती. कारण धमाल यायला समोरूनही थोडा का होईना प्रतिकार असावा लागतो. तिथे वेस्ट इंडियन फॅन औषधालाही नव्हता. एकमेव अंबानी कुटुंब चौपाटीवर उभं राहून पाणीपुरी खाताना दिसलं असतं, पण वेस्ट इंडियन दिसत नव्हता. मला ते ओव्हलवरच्या मॅचचे जुने दिवस आठवले. लंडनमधल्या ब्रिक्स्टनजवळच्या जमैकन मंडळीचा तो दिवसभर चालणारा दंगा. ती नाचगाणी आठवली. आता बर्मिंगहॅम असं आहे की, काही दिवसांनी पाकिस्तान त्यावर हक्क सांगू शकतं. तिथल्या फिश ऍण्ड चिप्सची जागा आता मोगलाई करीने घेतलीय.
वेस्ट इंडियन संघ तरी यांना वेस्ट इंडियन किंवा हिंदुस्थानी संघ पूर्वीचा हिंदुस्थानी संघ कुठे वाटतो? सगळंच बदलतंय.
हिंदुस्थानी गोलंदाजांना विशेषतः वेगवान गोलंदाजांचं या विश्वचषकातलं प्रगतिपुस्तक अविश्वसनीय आहे. आमचा लाडका रमाकांत देसाई स्वर्गातून मॅच पाहत असते तर त्याने वर ब्रह्मदेवाशी हुज्जत घातली असेल की, मला या काळात का जन्माला घातलं नाही? वेस्ट इंडीजविरुद्ध बुमरा-शमीने मिळून 12.2 षटकांत फक्त 25 धावा देऊन 6 बळी घेतले. जे वेस्ट इंडियन फलंदाज वेगवान गोलंदाजीच्या पाळण्यात वाढतात, उसळत्या चेंडूच्या शाळेत शिकतात त्यांची ही हालत व्हावी? आपला वेगवान दर्जा, गोलंदाजी दर्जा तर वाढला आहेच, पण त्यांचाही फलंदाजीचा दर्जा गाळात गेलाय. हे गोलंदाजीचं पृथक्करण 2019 च्या विश्वचषकाचं वाटत नाही. ते 1950-60 च्या टमन, स्टॅथम काळातलं वाटलं. इंग्लिश वातावरण, पाऊस, सकाळी साडेदहाला मॅच सुरू होणं वगैरेंमुळे चेंडू स्विंग होणार. सुरुवातीला विकेटस् जातील वगैरे अपेक्षा होत्या, पण तसं काही घडलेलं नाही. आता ही रंजक आकडेवारी पाहा. 2007 साली वेस्ट इंडीजमध्ये गोलंदाजांनी केलेला सरासरी स्विंग ‘1.130चा होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात 0.9930 होता. आता तो फक्त 0.6490 आहे. जिथे सर्वाधिक हवा तिथे कमी आहे. 2011च्या हिंदुस्थानातल्या विश्वचषकाएवढा! पांढऱया कुकाबुरा चेंडूची ती करामत असेल, पण गोलंदाज चेंडू स्विंग करू शकले नाहीत हेसुद्धा तेवढंच खरं. त्यामुळे झालंय काय की, आघाडीची भागीदारी भलतीच बहरलीय. या विश्वचषकात ती आतापर्यंत सरासरी 44.36 आहे. ऑस्ट्रेलियात 2011 मध्ये ती 31.18 होती. वेस्ट इंडीजमध्ये 29.23 होती. म्हणजे कमी झालेल्या स्विंगबरोबर ती वाढत गेली. आता या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी गोलंदाजांची कामगिरी पाहा. एक ऑस्ट्रेलियाचा स्टार्क सोडला तर इतर कुठल्याही गोलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजाइतक्या चांगल्या रीतीने नवीन चेंडू वापरलेला नाही. आणखीन एक सरासरी डोळय़ांखालून घाला. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकांत सरासरी षटकामागे 3.7 धावा दिलेल्या आहेत. इतर सर्व षटकांमागे 4.9 च्या पुढे आहेत. कळलं, रमाकांतला आजच्या काळात जन्म का घ्यावासा वाटला असता.
जोपर्यंत भुवनेश्वर खेळत होता तोपर्यंत शमी कुणाच्याही खिजगणतीत नव्हता. आता शमीने दोन सामन्यांत 8 बळी घेतले. आता भुवनेश्वर हवाच असं वाटत नाही. संधीच्या घोडय़ावर कशी मांड ठोकायची ते शमीने दाखवलंय. त्याने नवीन चेंडू स्विंग केलाय. परवा शाय होपच्या बॅट आणि पुढच्या पॅडमधून जो चेंडू आत घुसला तो जंजीरमध्ये प्राण अमिताभच्या केबिनमध्ये बेदरकारपणे घुसतो तसा घुसला. त्याने चेंडू उसळवण्यासाठी आखूड टप्प्याचा उपयोग केला, पण बऱयाचदा चेंडू पुढे ठेवून स्विंगही मिळवला. कधी चेंडू पुढे ठेवावा, कधी उसळवावा हे शमीचे गणित बऱयाचदा बरोबर आलं. त्याच्याकडे वेग आहेच. तो उंच आहे, वरतून चेंडू सोडतो. त्यामुळे बाऊन्सही चांगला आहे. त्याने गेलला किंवा ओशेन थॉमसला टाकलेले चेंडू आठवा. गेलच्या अंगावर धावून गेलेल्या चेंडूला पूल करताना गेल नीट पोझिशनमध्येच नव्हता आणि थॉमसच्या बाबतीत तो चेंडू सोडण्याची त्याची कुवतच नव्हती. बरं बुमरा-शमीने फलंदाजांचा श्वास कोंडल्यावर आणि पंडय़ा आल्यावर मस्त मोकळा श्वास त्याला घेता येतो असंही नाहीय. तोही सरासरी 85 मैलाने चेंडू टाकतो. वरच्या दोघांपेक्षा चार धावा जास्त देत असेल, पण विकेटस्ही काढतो आणि त्यानंतर दोन फिरकी गोलंदाज आपली अदाकारी दाखवतात.
हिंदुस्थानच्या मधल्या फळीने विकेटस् देण्याचा डॉट बॉल्सचं औदार्य दाखवण्याचा गुन्हा केला तरी त्यांना निष्णात वकील बनून गोलंदाज सोडवतात. म्हणून हिंदुस्थानी संघ अजून अजिंक्य आहे. मधल्या फळीची आपली काळजी अजून दूर होत नाहीय. मॅचनंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुलने खेळपट्टी ‘ट्रपेस’ होती वगैरे सांगितलं. जगात आदर्श खेळपट्टी कुठेच नसते. कधी चेंडू थांबतो, कधी कमी-जास्त उसळतो, कधीही मंद होतो. क्रिकेटची हीच तर गंमत आहे. फलंदाजांनी त्या खेळपट्टीशी जुळवून घ्यायला हवं. नाचता येईना अंगण वाकडं नको. परवा त्यांच्या वीस षटकांत म्हणजे एकशेवीस चेंडूंत रोच आणि होल्डरने 92 निर्धाव चेंडू टाकले. त्यांच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करूया, पण याचा अर्थ असा होतो की, 92 चेंडूंवर हिंदुस्थानी फलंदाज एक धाव घेण्याइतपत चांगला फटका मारू शकले नाहीत. एक तर बचाव केला किंवा चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेले. ऍलनच्या फिरकीलही दुसऱया स्पेलमध्ये इतकं सावधपणे खेळलं गेलं की, जणू येणारा चेंडू बॉम्बच आहे. मोठे फटके नको, पण चेंडू प्लेस तरी करता आला पाहिजे ना? विचार करा. धोनी 8 धावांवर यष्टिचित झाला असता तर… एकेकाळी धोनी डोळय़ांवर पट्टी बांधून चेंडू प्लेस करू शकत होता. आता त्याला डोळे उघडे ठेवून करणं जड जातं. धोनी जेव्हा विराट सोडून इतरांबरोबर धाव घेतो त्यावेळी त्याला त्या फलंदाजाच्या रनिंग बिटविन द विकेटस्च्या क्षमतेवर धोनीचा पूर्ण विश्वास आहे असं वाटत नाही. त्यात तो विराटबरोबर धावतो तेव्हा दोघांना फक्त डोळय़ाने बोललं तरी चालतं. म्हणून मला वाटतं की, धोनीने चौथ्या क्रमांकावर यावं. थोडा वेळ घ्यावा. विराटबरोबर वेगात धावा घ्याव्यात आणि मग 45 षटकांच्या आसपास मोठय़ा फटक्यांचा भाता उघडावा. प्रत्येक वेळी सेट होत असताना होपप्रमाणे कुणी पृथ्वीराज चौहान होऊन जीवदान देईल असं नाही. पहिल्या मॅचपासून आपले फलंदाजीतील हीरो तेच आहेत. रोहित, विराट आणि पांडय़ा. इतरांनीही कंबर कसायला हवी.
मी सहसा खूप आकडेवारी देत नाही. कारण असं म्हटलं जातं की, ‘Statistics are like biki i clad beauty. What they reveal is suggestive but what they hide is vital’ मी दिलेली आकडेवारी ‘सजेस्टिव’ आहेच, पण ‘व्हायटल’ही आहे.




























































