
>> द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानी संघ जिंकतोय खरे, पण अजून विश्वचषक जिंकायला लागणारी दादागिरी या संघाकडे दिसत नाही. संघातली भगदाडं बुजत नाहीत. एक बुजलं तर दुसरीकडे भगदाड पडतं. ‘तो नको हा हवाय’, ‘हा नको तो हवाय’ हे हट्टही आता संपत आले. रवी शास्त्री आणि बांगरचा विचार तेवढा आपण अजून केलेला नाही. भारत अरुणचा विचार आपण असाही नाही करणार. कारण तो तरुण असतानाही विचार कधी केला नव्हता. हा परफेक्ट संघ आहे असं वाटतच नाहीये. विजय शंकरच्या नावाने आपण खडे फोडले. तो गेला कैलासाला निघून. पण तरी आपण इंग्लंडला हरवले का? तर उत्तर नाही असं आहे. आणि बांगलादेशबरोबर आपण जिंकलो खरे, पण आपणही रक्तबंबाळ झालो. विराट कोहलीने नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 48 वी ओव्हर शमीला दिली असती आणि बुमरासाठी 49 वी ठेवली असती तर कदाचित अघटित घडलं असतं. बुमराच्या दोन यॉर्कर्सनी खेळ खल्लास केला.
आपण एकेका गोष्टीचं मूल्यमापन करूया.
रोहित शर्माने हिंदुस्थानला धावा दिल्या. चार शतकं दिली. अनिमिष नेत्रसुख दिलं, पण कुठल्या ना कुठल्या क्षेत्ररक्षकाच्या मेहरबानीवर ही शतकं उभी आहेत हे विसरता येत नाही.
बरं, आपण 29.2 षटकांत बांगलादेशविरुद्ध 180 धावांची पहिली भागीदारी करतो आणि मग पुढच्या 20.4 षटकांत आपण फक्त 134 धावा करू शकतो? अर्थात आपल्याकडे कारणं आहेत की खेळपट्टी थोडी मंद होत जाते, चेंडू थांबतो वगैरे. आपल्या भरतभूमीत हे माझ्या वडिलांच्या बालपणापासून घडतंय. इंग्लंडच्या बाबतीतही दोन दिवस आधी तेच घडलं होतं. हे त्याचं स्पष्टीकरण नाही. आपलं पोषण होतं अशा खेळपट्टय़ांवर! पण असा विचार करा की, तीच गोष्ट बांगलादेशला कुठे नडली? विकेटस् पडत असताना ते धावांच्या गतीवर उत्कृष्ट मांड ठोकून बसले होते. फलंदाजी ताकदवान करण्यासाठी आपण तीन यष्टिरक्षक एकत्र खेळवले. खरं तर चार, कारण राहुलही यष्टिरक्षण करतो. तसे आपण तीन कर्णधारही खेळवतोय. एक कर्णधार टॉस करतोय, धावा करतोय आणि गोलंदाजीत बदल करतो. रिह्यूचं उत्तर मनासारखं मिळालं नाही तर चिडतोदेखील! दुसरा कर्णधार यष्टीरक्षण करतो, क्षेत्ररचना लावतो आणि गोलंदाजांना चार युक्तीच्या गोष्टी सांगतो. तिसरा कर्णधार फक्त धावा करतो. लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू असूनही यश मिळालं तरी ते लखलखतं यश मिळत नाही. अफगाणिस्तान काय किंवा बांगलादेशविरुद्ध तर यशाला भोज्या करताना आपले शेवटचे काही श्वास शिल्लक आहेत असेच वाटत होते. ‘सुटलो’ हीच भावना होती. फलंदाजीच्या बाबतीत विशेषतः मधली षटकं आणि हाणामारीच्या षटकांत धावांची गती वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं करायची गरज आहे. त्यासाठी धोनीने खरंच चौथ्या क्रमांकावर यावे आणि भागीदार्या करताना मोठे फटके मारण्याची जबाबदारी रिषभ पंत आणि हार्दिक पांडय़ा या नव्या दमाच्या फलंदाजांवर सोपवावी. आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना करून द्यावा. धोनीचं विराटबरोबरचं रनिंग बिटविन द विकेट आणि इतरांबरोबरचं यातही फरक आहे. विराटचं आणि त्याचं कॉम्बिनेशन हे आशा भोसले-आर. डी. बर्मनसारखं असतं. इतरांचं द्वंद्वगीत म्हणजे कुंदनलाल सैगलबरोबर उषा उथ्थप गाणे गातेय असे वाटते. जे स्टोक्स-बटलर करतात किंवा काल फारसे ज्ञात नसलेल्या सैफुद्दीनने केलं ते पंत-पांडय़ाने करायला हवं. त्या जाडेजाला संघात बसवा बाबा कसा तरी.
विराट कोहलीची मोठी खेळी होत नाहीए ही एक आपल्या संघाच्या पायात घुसलेली गोळी आहे. तो टिकला की रनरेटला हरणाचे पाय कधी फुटतात कळत नाही. आधुनिक क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकात धावा वाढवायच्या असतील तर शंभरचा स्ट्राइकरेट आता पुरत नाही. तो दीडशेच्या पुढे पाहिजे. म्हणून तर आपल्याला धोनी मंदावलाय असं वाटतं. तो शंभरच्या स्ट्राइकरेटने आजही खेळतो. पूर्वी तरी चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. मऊ व्हायचा. आता दोन नवीन चेंडू असल्यामुळे चेंडू रिव्हर्स स्विंग फार फार क्वचित होतो. फटक्यासाठी चेंडू पूर्वीपेक्षा जास्त टणक राहतो टी-20च्या अनुभवामुळे. मोठय़ा फटक्यांचा सराव वाढलाय. ती वृत्ती वाढलीय. आपली नवी फलंदाजांची पिढी टी-20च्या संस्कारावर वाढलीय. त्यामुळे थोडी मंद होत जाणार्या खेळपट्टीचे अडथळे तुडवत चांगल्या पायाभरणीवर मोठा इमला हिंदुस्थानने उभा करायलाच हवा. गोलंदाजीच्या बाबतीत हे सर्व काही आलबेल नाही. पूर्वी शाळेत ‘सूर्य नसता तर…’ वगैरे टाइपचे निबंध लिहायला सांगत. त्या धर्तीवर ‘जसप्रीत बुमराह नसता तर…’ या निबंधाचा विचार करून बघा. बघता बघता आपल्या गुणतक्त्यातले काही गुण गायब होतील. अफगाणिस्तान-बांगलादेशविरुद्धचं यश त्याच्यावरच अवलंबून होतं. तो एकच पूर्ण भरवसा टाकावा असा गोलंदाज आहे. इतर वेगवान गोलंदाजांना जे बळी मिळतात त्यातही बुमराहचा वाटा आहे. बुमराहला खेळून काढायचं आणि दुसर्या गोलंदाजावर हल्ला करायचा हा इतर संघांचा प्लॅन असतो. त्यामुळे बुमराहला जपून खेळलं जातं. सर्वसाधारणपणे तो तीन स्पेल टाकतो. एक सुरुवातीला, तेव्हा तो धावा देत नाही. दुसरा स्पेल त्याला जमलेली जोडी फोडण्यासाठी मिळतो. बर्याचदा तो त्यात यशस्वी होतो आणि तिसर्या स्पेलमध्ये त्याच्या गोलंदाजीवर हल्ला ही फलंदाजाची आत्महत्या असते. समोर कुणीही असो, त्याच्यावर दबाव पडलाय असं वाटत नाही. त्याचा स्लोअरवन चांगला जातो. त्याचा उसळता चेंडू योग्य तर्हेने उसळतो आणि यॉर्कर तर त्याचा गुलाम आहे. यॉर्करने इतकी गुलामी अलीकडच्या काळात वासीम अक्रम, स्टार्क, मलिंगा सोडून इतरांची फार क्वचित केली होती. समोरच्या शमीकडे पहा. तिसर्या स्पेलचा दबाव मोठय़ा फलंदाजीसमोर झेलणं त्याला जमलेलं नाही. आधीच्या स्पेलमधल्या विकेटस्चं पुण्य त्याच्या दोन-तीन षटकांतल्या धावांमुळे धुऊन निघतं. तरी बरं, पांडय़ा दहा षटकं सातत्याने टाकतोय. पण सहावा गोलंदाज संघात हवा. कारण इंग्लंडप्रमाणे एखादा गोलंदाज परफॉर्मन्सच्या बाबतीत रजेवर गेला तर लोकम म्हणून काम करणारा हवाच. म्हणून जाडेजा हवा.
नाही तरी तेवढाच बदल शिल्लक आहे. पहा तो करून.




























































