पालिका शाळांमधील ‘ई-लायब्ररी’त पुस्तके, ग्राफिक्स, कविता, चलत्चित्रे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc

पालिका शाळांमधील ‘ई-लायब्ररी’त विद्यार्थ्यांना आता पुस्तके, ग्राफिक्स, कविता आणि चलचित्रे कॉम्प्युटरवर पाहता येणार आहेत. सुरुवातीला 25 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार असून त्यानंतर शाळांची संख्या वाढवली जाणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे आणखी कमी होणार आहे.

पालिका शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, नव्या शाळा इमारती, शाळांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, मोफत 27 वस्तू, टॅब, मोफत बस पास अशा सुविधांबरोबरच या वर्षीपासून पालिका शाळांमध्ये आयसीएसई-सीबीएसई बोर्ड, पालिकेच्या गरजू विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी मदत, डिजिटल दुर्बीण असे उपक्रमही राबवले जात आहेत. यामध्ये आता दर्जेदार शिक्षणासाठी ‘ई-लायब्ररी’ उपक्रम राबवला जाणार आहे. कंत्राटदार मेसर्स आयएनपी कॉम्प्युटर्स टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून राबवण्यात या उपक्रमासाठी पालिका एक कोटी 31 लाखांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

‘ई-लायब्ररी’ उपक्रमात माध्यमिकच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना छापलेले पुस्तक व इतर पुस्तके ध्वनी, चलचित्र, ग्राफिक्सच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात कॉम्प्युटरवर पाहता येणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय आणि इतर पुस्तके डिजिटल स्वरूपात मिळणार असल्यामुळे अभ्यासक्रम आकलनशक्ती वाढणार आहे.