वादळाआधी गुजरातमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; ‘बिपरजॉय’ च्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बुधवारी दुपारी भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची 3.5 तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका असतानाच गुजरातला भूंकपाचे धक्के बसले आहे. अरबी समुद्रात सध्या’बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंघावत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याआधी कच्छ जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील बछाऊपासून पश्चिम-नैऋत्य दिशेला 5 किलोमीटर अंतरावर होता. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये घरांची पडझड झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अतितीव्र झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छ किनारपट्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ कच्छ किनार्‍याकडे येत असल्याने गुजरातमधील आठ जिल्ह्यांतील समुद्राजवळ राहणाऱ्या सुमारे 50 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गुजरातमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची अठरा पथकं तैनात केली आहेत.