जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; महिन्याभरात सहावा भूकंप

377
प्रातिनिधीक फोटो

जम्मू कश्मीरला मंगळवारी सकाळी 8.56 वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.0 एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू कटरापासून पूर्वेला 84 किलोमीटरवर जमीनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होता. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांना भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जम्मू कश्मीरलाच महिन्याभरात भूकंपाचा सहावा धक्का जाणवला आहे.

जम्मू कश्मीरला मंगळवारी सकाळी 8.56 मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकजण घराबाहेर पडले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.0 नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे जिवीत किंवा वित्तहानीचे वृत्त नसले तरी महिन्याभरात अनेकदा भूंकपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कटरापासून पूर्वेला 84 किलोमीटरवर होता. तसेच तो जमीनीखाली 10 किलोमीटरवर होता, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मलॉजीकडून सांगण्यात आले.

भूंकपाच्या तीव्रतेनुसार देशाचे चार भाग करण्यात येतात. जम्मू कश्मीर त्यातील धोकादायक असलेल्या झोन 5 मध्ये येते. संशोधकांच्या मते झोन 5 मध्ये असलेल्या क्षेत्रात 9 रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंप येण्याची शक्यता असते. जम्मू कश्मीरसह ईशान्य हिंदुस्थान, हिमाचल प्रदेश,उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारमधील काही भाग आणि अंदमान निकोबार बेटे यांचा झोन 5 मध्ये समावेश होतो. या भागात महिन्याभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. देशातील विविध भागात महिन्याभरात 11 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यात ईशान्य हिंदुस्थान, दिल्ली आणि जम्मू कश्मीरला सर्वाधिक धक्के जाणवले आहे. हिमालयाजवळ जमिनीखाली मोठ्या प्रमाणाच हालचाल होत असल्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे संशोधकांनी सांगितले. तसेच देशात एखाद्या मोठा भूंकप येण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या