
कोयना परिसरात आज दुपारी भूकंप झाला. गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा या भागामध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंप सौम्य स्वरुपाचा होता आणि रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3 एवढी होती, अशी माहिती कोयना नगर उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.
दुपारी एकच्या सुमारास कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात कोयनेपासून 12 किलोमीटर, हेळवाक गावच्या नैऋत्येस 7 किलोमीटर अंतरावर होता. केंद्रबिंदूची खोली 9 किलोमीटर इतकी होती. हा धक्का विशेषत्वाने कोयनानगर परिसरात जाणवला असून धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले.

























































