
टर्की आणि सीरिया या देशांना काही तासांच्या अंतराने पाच मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांचा सामना करावा लागला आहे. भूकंपामुळे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आत्तापर्यंत ५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे तेथे साधनसंपत्तीचेही नुकसान झाले आहे. सदर परिसरामध्ये युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.
सोमवारी पहाटे चार वाजता टर्कीमध्ये भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल होती असे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ७.६ रिश्टर स्केल तीव्रता असलेल्या भूकंपाची सुरुवात झाली. पुढे रात्री उशिरा तिसऱ्यांदा भूकंप झाला. याची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. आज मंगळवारी दुपारी ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सामना टर्कीमधील नागरिकांना करावा लागला. त्यानंतर लगेच ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का तेथे बसला. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरामध्ये भूकंप होण्याच्या प्रमाणामध्ये तुलनेने वाढ झाली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकंप होतात. दरवर्षी तब्बल २० हजारांपेक्षा जास्त भूकंप होत असतात. बहुतांश वेळा यांची तीव्रता कमी असल्यामुळे त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही.
भूकंप का होतात?
भूकंप शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे होणाऱ्या कंपनांमुळे होणारी स्थिती म्हणजे भूकंप असे म्हटता येईल. ही आपत्ती का उद्भवते हे जाणून घेण्यासाठी पृथ्वीची रचना समजून घेणे आवश्यक आहे. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात.
भूकंप झाल्यावर सर्वात जास्त हानी कुठे होते?
भूकंपाचे धक्के बसल्यावर तो जेथे सुरु झाला आहे, त्या ठिकाणाला भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हटले जाते. या केंद्रबिंदूच्या आसपासच्या परिसरामध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो. भूकंपाचा प्रभाव समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची मदत घेऊया. एका शांत तळ्यामध्ये दगड टाकल्यानंतर काही लहरी निर्माण होतात. जसजश्या या लहरी पसरत जातात, तसतशी त्यांची तीव्रता कमी होत जाते. याच प्रमाणे भूकंपाच्या केंद्रबिंदूकडून भूकंपाचे धक्के जमिनीच्या पृष्ठभागावर काही अंतरापर्यंत पसरत जातात.
हिंदुस्थानामध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचे प्रमाण कमी असल्यामुळे भूकंपाबाबत जागरुकता तुलनेने कमी आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरामध्ये भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये तेथील एक इमारत कोसळली. या अपघातामध्ये त्या इमारतीमध्ये सहा वर्षीय मुस्तफा थोडक्यात बचावला. घरच्या पलंगाखाली लपून राहिल्याने त्याला फारशी इजा झाली नव्हती. ही कृती करण्याची प्रेरणा डोरेमॉन या कार्टूनमधील नोबिता पात्राकडून मिळाल्याचे त्याने सांगितले. कार्टूनच्या एका भागामध्ये भूकंप आल्यावर काय करायचे हे दाखवण्यात आले होते, तेच पाहून मुस्तफाने आपला जीव वाचवला होता.
भूकंप सुरु असताना काय करावे?
सर्वप्रथम शांत राहा. घाबरु नका. घाबरल्यामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकता.
आधी स्वत:ची काळजी घ्या. शक्य असेल तेव्हाच इतरांना मदत करा.
घर, ऑफिस, शाळा अशा ठिकाणी असल्यास –
– पलंग, टेबल यांच्या खाली लपून राहा. यामुळे छतावरुन कोसळणाऱ्या गोष्टींपासून तुमचे रक्षण होईल.
– खिडकी, काचा, आरशा यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.
– इमारतीमध्ये असल्यास लिफ्टचा वापर करणे टाळा. आधीच लिफ्टमध्ये असल्यास पुढच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न करा.
– जेवण बनवत असल्यास गॅस-सिलेंडर लगेच बंद करा. मेणबत्ती किंवा काडीपेटीचा वापर टाळा.
– घरामध्ये पाळीव प्राणी असल्यास त्यांना मोकळं सोडा, जेणेकरुन त्यांना हालचाल करता येईल.
घराबाहेर असल्यास –
– उंच इमारती, मोठ्या झाडांपासून लांब राहा. मोकळ्या जागी राहण्याचा प्रयत्न करा.
– गाडी चालवत असल्यास वेग कमी करत सुरक्षित जागा पाहून गाडी थांबवा आणि गाडीबाहेर पडा.
– शहरामध्ये गाडी चालवत असल्यास उड्डाण पूलांच्या खाली उभे राहू नका.
भूकंप बंद झाल्यानंतर काय करावे?
– शक्य झाल्यास टिव्ही, रेडिओ किंवा मोबाईलद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
– परिस्थिती निवळल्यावर इतरांना मदत करायला जा.
– स्वयंपाकघरामधील सिलेंडर ताबडतोब बंद करा. तसेच विद्युत उपकरणांचा वापर करु नका.
– मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये असल्यास दरवाजा किंवा खिडक्या उघडताना काळजी घ्या.
प्राण्यांना, पक्ष्यांना भूकंप होण्याआधीच त्याची चाहूल लागते का?
प्राणी, पक्षी यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा अनेकपटीने जास्त असते असे मानले जाते. यावर संशोधन देखील सुरु आहे. खडकांच्या घर्षणामुळे तयार झालेली ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याआधीच त्या कंपनांचा अंदाज प्राण्यांना येऊ शकतो. कुत्रा, मांजर यांच्या सारखे प्राणी जमिनीवर झोपतात. परिणामी पृष्ठभागाशी त्यांचा संपर्क अधिक असतो. त्यामुळे त्यांना आधीच हालचाल जाणवते. भूकंपाचा परिणाम हवेच्या दाबावर देखील होतो. वातावरणामध्ये बदल झालेला वायूदाब प्राण्यांना त्यांच्या केसांमुळे (फर) जाणवतो.