
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्राणहिता नदीच्या केंद्रबिंदूपासून 77 किलोमीटर खोलीसह 4.3 रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने केली आहे. गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर झाफराबाद चक या प्राणहिता नदीवरील केंद्राजवळ सदर भूकंपाची नोंद घेतली आहे. अहेरी येथील नागरिकांच्या मते रविवारी सायंकाळी 6 वाजून 49 ते 50 मिनिटाच्या दरम्यान अचानक जमीन थरथरली आणि घरांमधील लोक भीतीपोटी बाहेर पडले. अनेकांच्या घरातील भांडी खाली पडली. हे झटके अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदपूर, आष्टी, बोरी, राजाराम खांदला या गावापर्यंत जाणवले, मात्र यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. वनविभागाचे सेवा निवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी अब्दुल्ल गफार इब्राहीम शेख यांनी हे भूकंपाचे झटके अनुभवले. त्यांनी 15 वर्षांपूर्वी आणि 2016 च्या दरम्यान असे भूकंपाचे झटके या भागातील नागरिकांनी अनुभवल्याचे सांगितले. ही भूकंपाच्या झटक्यांची तिसरी वेळ आहे.






















































