
काल दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा पराभव करून सर्वप्रथम देवधर करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता दुसऱया स्थानासाठी पूर्व आणि पश्चिम विभागात जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. जो जिंकणार तोच अंतिम फेरी गाठणार असल्यामुळे सौरभ तिवारीचा पूर्व विभाग की प्रियांक पांचालचा पश्चिम विभाग अंतिम फेरी गाठतो हे मंगळवारीच कळू शकेल.
काल स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक मारणारे दक्षिण आणि पूर्व विभाग एकमेकांशी भिडले आणि यात दक्षिणेचा संघ सरस ठरला. याच महिन्याच्या प्रारंभी त्यांनी स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या पश्चिम विभागाला नमवत दुलीप करंडक जिंकला होता. आता पुन्हा एकदा मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभाग विजेतेपदाच्या पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण विभागाने चारही साखळी सामने जिंकत अंतिम फेरी गाठली असून उद्या मध्य विभागाला हरवत ते सलग पाचवा विजय नोंदविण्यास उत्सुक आहेत.
अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी पश्चिम विभाग आणि पूर्व विभाग दोघेही सज्ज झाले आहेत. या दोन्ही संघांना केवळ दक्षिण विभागानेच हरवले आहे त्याच संघांशी उद्याच्या सामन्यातील विजेत्या संघाची गाठ पडणार आहे. पश्चिम विभागाकडे कर्णधार प्रियांकसह हार्विक देसाई, शिवम दुबे, सरफराज खानसारखे फॉर्मातील फलंदाज आहेत, तर पूर्व विभागाला सौरभ तिवारी, रियान पराग, सुभ्रांशु सेनापती, विराट सिंगसारखे फलंदाज लाभले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे उपांत्य फेरीचा दर्जा लाभलेला सामना कोणाच्या बाजूने झुकतो आणि कोणता संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































