
पूर्व उपनगरातील नाल्यांवर असलेले पूल आता लवकरच मजबूत होणार आहेत. नाल्यांवरील जुन्या पुलांच्या जागी नवे पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासाठी 51 कोटी 65 लाखांचा खर्च केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामध्ये भांडूप एस विभागातील विक्रोळी पूर्व, टागोरनगर गायकवाड उद्यानासमोरील नाल्यावरील पूल, भांडूप रेल्वे स्थानकाजवळील प्रवेशद्वार क्रमांक 1 आणि प्रवेशद्वार क्रमांक 2, तसेच पश्चिमेकडील एसएलआर डायग्नॉस्टिक्स सेंटरजवळच्या पुलाचे पुनर्बांधकाम होणार आहे. तर मुलुंड टी विभागातील नानेपाडा नाल्यावरील मोडकळीस आलेल्या पुलाचे नूतनीकरण होणार आहे.





























































