
मल्टिप्लेक्समधील महाग पॉपकॉर्न खावेच लागणार आहेत. कारण बाहेरील पदार्थ नेता येणार नाहीत. चित्रपटगृहांत विक्री केल्या जाणाऱ्या वस्तू आणि पदार्थांचे दर ठरविण्याचा अधिकार पूर्णपणे तेथील व्यवस्थापनाला आहे. मात्र, ते खरेदी न करण्याचा पर्याय प्रेक्षकाकडे आहे. चित्रपटगृहांनी पिण्याचे पाणी मोफत पुरवले पाहिजे, असे निर्देश सर्वौच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
चित्रपटगृहात बाहेरून खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देण्यासंदर्भातील याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी, खंडपीठाने चित्रपटगृह ही एक खासगी मालमत्ता असून तेथील नियम ठरविण्याचे अधिकार तेथील व्यवस्थापनाला आहेत. मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विकणे ही व्यावसायिक बाब असून त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. जर एखादा प्रेक्षक चित्रपटगृहात गेला तर त्याला तेथील अटी-शर्ती व नियमांचे पालन करावे लागेल, असे मत व्यक्त केले.
जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
जम्मू आणि कश्मीर उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये स्वत:चे खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या 2018 मधील या निर्णयाला थिएटर मालक आणि मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला आहे.
























































