आमचा ‘वाड्या’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शेफ विष्णू मनोहर

ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर… अर्थात आमचा आणि तमाम मराठी चित्रपटसृष्टीचा वाडय़ा. अतिशय चोखंदळ, खाण्याची आवड हे त्याचे वैशिष्टय़…

जयवंत वाडकर म्हणजे आमचा ‘वाडय़ा’, सगळी चित्रपटसृष्टी त्याला ‘वाडय़ा’ या नावानेच हाक मारते. हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटसृष्टीत काम करून नाव कमावल्यावर अजूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. सोशल मीडियावरचा सगळ्यात अपडेटेड कलाकार म्हणजे आपला वाडय़ा. चित्रपत्रसृष्टीशी संबंधित कार्यक्रमात यांची हजेरी असल्यानंतर कार्यक्रम संपल्यावर दहाव्या मिनिटाला कार्यक्रम संबंधित महत्त्वाचे फोटो सोशल मीडियावर लगेच अपडेट करणारी व्यक्ती म्हणजेच जयवंत वाडकर. आता तर असं झालं आहे की, जयवंत वाडकरांच्या स्टेजवर फोटो यावा यासाठी मोठमोठी कलाकार मंडळीसुद्धा वाट बघत असतात. सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींचे, कलाकारांचे वाढदिवस लक्षात ठेवून ते इतरांना आठवून देणे हा यांचा छंद. म्हणून चित्रपटसृष्टीतलं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांना खाण्याचा भारी शौक. शाकाहारी जेवण असो अथवा मांसाहारी.

काही दिवसांपूर्वी एका पार्टीत मी जयवंत वाडकर एकत्र आलो. मी जयवंतला म्हटलं की, तुझ्याबरोबर खाण्या-पिण्याच्या विषयांवर गप्पा मारायच्या आहेत, तर तो आनंदाने तयार झाला. जयवंतला सेटवर 9 वाजताचा कॉल टाइम दिला जातो. जरी शूटिंग 3 वाजता असेल तरी. कारण सगळ्यांना माहीत आहे की, जयवंत रिकाम्या हाताने येत नाही, बरोबर भरपूर खाण्याच्या जिन्नस घेऊन येतो. खाण्याच्या गमती-जमतीचा विषय निघाल्यावर त्यांच्या लक्षात राहण्याजोगी एक खूप छान आठवण त्यांनी सांगितली. मध्ये पंधरा दिवसांच शूटिंग एका जहाजावर होणार होतं. जहाज मुंबईहून निघालं, दुसऱया दिवशी शूटिंग सुरू झालं, पण तिथल्या युनिटमधील लोकांना तेच तेच जेवण जेऊन कंटाळा आला होता. ही गोष्ट वाडय़ाच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. त्यांनी लगेच किचन गाठलं. तिथे नेमका त्याला एक मराठी शेफ भेटला आणि त्यांच्या कडून वाडय़ानं झुणका व भाकर बनवून घेतली. ती पाहिल्याबरोबर युनिटमधील सर्व मंडळी आपली कामं सोडून झुणका-भाकरवर तुटून पडली.

त्याच्या पदार्थांच्या आवडी-निवडी विचारल्या. ते म्हणाला, शाकाहारी व मांसाहारी पदार्थ बरोबरीने आवडतात, पण त्यातल्या त्यात मासे जास्त प्रिय आहेत. स्वतः स्वयंपाक करतोस का? असं म्हटल्यावर तो म्हणाला, मी आवडीने स्वयंपाक करतो. मन लावून स्वयंपाक करणं म्हणजे ध्यान करण्यासारखं होय. म्हणूनच त्याचा हातचा हिरव्या मसाल्यातील मासा लोकप्रिय आहे. एका शाकाहारी माणसाला चॅलेंज करून त्यांनी माशापासून तयार केलेला पदार्थ खाऊ घातला.

प्रत्येक शहरात खाण्याची वेगवेगळी ठिकाणे त्यांच्या आवडीची आहेत. जसे दादरमधील ‘आस्वाद’ची कोथिंबीर वडी, मसाले भात विषेशतः आवडतो, मुंबईतील ‘जिप्सी’ चायनीजमधील माशाचे प्रकार अशी कित्येक नावं घेता येतील. जयवंतला शेवटचा प्रश्न केला की, भविष्यात रेस्टॉरंट काढायला आवडेल का? त्यावर त्यांचं उत्तर होतं की, मी याआधीसुद्धा हा विचार केला व एक रेस्टॉरंटसुद्धा काढले होतं, पण ते आमच्याने सुरळीत चालवता आले नाही. तेव्हापासून मी ठरवलं की, रेस्टॉरंट जर पुन्हा काढलं तर सगळी कामे बाजूला ठेवून फक्त रेस्टॉरंटकडे लक्ष देईन. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलंच नाही. पुन्हा भेटण्याचं वचन देऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

हिरव्या मसाल्यातील मासा
साहित्य – 300 ग्रॅम पापलेट, मीठ चवीनुसार, 7-8 हिरव्या मिरच्या, ंपांव वाटीं कोथिंबीर, 10-12 पालकाची पाने, 2 चमचे पातीचा लसूण, पाव वाटी पातीचा कांदा, 4 चमचे पुदिना, पाव वाटी कोथिंबीर.

कृती – पापलेटचे तुकडे स्वच्छ करून त्याला मीठ लावून ठेवा. 7-8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 10-12 पालकाची पाने, पातीचा लसूण, पातीचा कांदा, थोडे मीठ घालून एकत्र वाटून घ्या. नंतर या मसाल्यात पापलेटचे तुकडे तुकडे बुडवून ठेवा व तव्यावर मसाल्यासोबत तेल टाकून शेलो फ्राय करा. सर्व्ह करतेवेळी बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबिरीचे मिश्रण भरपूर घालून सर्व्ह करा.

मसाले भात
साहित्य – 3 वाटय़ा तांदूळ , 1 वाटी सोललेला बटाटा, 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे, अर्धा चमचा शहाजिरे, 1-1 चमचा आलं-लसूण, अर्धी वाटी दही 1-1 चमचा धणे-जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, तिखट चवीनुसार, 1 चमचा खडा मसाला, पाव वाटी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे साजूक तूप, 4 चमचे ओलं खोबरं.

कृती – सर्व प्रथम एक वाटी सोललेला बटाटा, एक वाटी फ्लॉवर तेलात तळून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये शहाजिरे, आलं, लसूण, दही, धणे-जिरे पावडर, हळद, तिखट, थोडा खडा मसाला, बारीक चिरलेला कोथिंबीर व तळलेले बटाटे, फ्लॉवर टाका. दुसऱया एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडं मीठ व धुतलेला तांदूळ शिजत ठेवा. त्याचबरोबर फ्लॉवर, बटाटय़ाचा मसाला व काळा मसाला पण घाला. त्यावर 2 चमचे साजूक तूप घालून मंद आचेवर भात शिजवा. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर घालून खायला द्या.

कोथिंबीर वडी
साहित्य – 2 वाटय़ा कोथिंबीर, 2 चमचे आलं-लसूण, मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा आमचूर पावडर, हिंग, पाव -पाव चमचा हळद, 3 वाटय़ा बेसन.
कृती – सर्वप्रथम आलं-लसूण पेस्ट फोडणीला घालून त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर, साखर, हिंग घालून परतून घ्या. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर थोडे परतल्यावर त्यामध्ये 4 वाटय़ा पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर बेसनाची पेस्ट घाला. नंतर एकत्र करून थोडी वाफ आल्यावर हे मिश्रण एका ट्रेमध्ये थापून थंड करा. नंतर त्याच्या वडय़ा पाडून तळून खायला द्या.