राज्यातल्या वाईन शॉपवर निवडणूक आयोगाचाही वॉच

326

राज्यात दारूच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. त्यानुसार त्यांनी कडक नजरही ठेवली आहे. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगानेही राज्यातल्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचे पत्र धाडले असून वाईन शॉपमधील दारूच्या विक्रीवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असून या काळात दारूचे वाटप, पैशाचे व्यवहार, काळ्या पैशाची देवाणघेवाण यावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्यातल्या प्रत्येक वाईन शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे करण्यात आले आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यामधील रेकॉर्डिंग किमान एक महिना जपून ठेवावे लागेल. सरकारी यंत्रणेने रेकॉर्डिंग मागितले तर सादर करावे लागेल.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, मुंबई शहर जिह्यात सुमारे 11 हजार वाईन शॉप्स आहेत. या सर्व वाईन शॉपमधील दारूच्या विक्रीवर सरकारी यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येईल.  दारूच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याचे आमचे काम नाही, पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील कॅमेर्‍यांचाही वॉच

वाईन शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज वेळोवेळी तपासले जाईल. त्याशिवाय वाईन शॉपच्या परिसरातील रस्त्यावर पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या माध्यमातून तपासले जाईल. त्यातून वाईन शॉपच्या परिसरातील हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या