इको कारचे सायलेन्सर चोरणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इको कारचे सायलेन्सर चोरी करणाऱया टोळीला क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. अली रजा छोटेमियाँ मिर्झा ऊर्फ नदीम, दीपक बाबुराव वाघमारे, अल्ताफ सिराजउद्दीन शेख, मोहम्मद मोहसीन हसीन शेख आणि जुबेद रेहमान खान अशी या पाच जणांची नावे आहेत. ही टोळी कारचे सायलेन्सर वितळवून त्यापासून सोने तयार करत होती.

शहरात गेल्या काही दिवसांपासून इको कारच्या सायलेन्सर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्याची दखल घेत प्रॉपर्टी सेलने तपास सुरू केला. प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी काही गॅरेजवाले आणि रेकॉर्डवरच्या आरोपींची चौकशी केली. तेव्हा वडाळा येथे एक भंगारवाला चोरीचे सायलेन्सर घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे पंधरा दिवस फिल्डिंग लावली. त्यानंतर अली रजा, दीपक आणि अल्ताफ हे तिघे सायलेन्सर विक्रीसाठी आले असताना पोलिसांनी त्या तिघांना रंगेहाथ पकडले. त्या तिघांच्या चौकशीनंतर शेख आणि खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अली, दीपक आणि मोहंमद हे तिघे सायलेन्सर चोरीसाठी मुंबईत फिरतात. इको गाडी दिसली की अली हा त्या गाडीच्या खाली जातो. तर दीपक आणि मोहंमद हे रेकी करतात. चोरलेले सायलेन्सर ते शेखकडे देतात. कटरच्या साहाय्याने शेख हा सायलेन्सर कापतो. त्या सायलेन्सरमधून निघणारी 700-800 ग्रॅम माती काढून ती माती खानकडे दिली जाते. त्यानंतर खान ती माती काढून पुढे विक्रीसाठी देत असतो. त्या पाच जणांच्या अटकेने वीस गुह्यांची उकल झाली आहे.

सायलेन्सर चोरीतून डबल फायदा
अली, दीपक, अल्ताफ हे सायलेन्सर चोरायचे. चोरलेले सायलेन्सर हे 15 हजार रुपयाला विकायचे. सायलेन्सरच्या आत असलेल्या फिल्टरमध्ये प्लॅटिनमचे कोटिंग असते. त्याची माती 20-25 हजार रुपयांना विकतात. माती काढल्यानंतर त्या सायलेन्सर मधील फिल्टर तोच ठेवून पुन्हा सायलेन्सर विक्रीसाठी चोरबाजारात विकला जातो.