
अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने बुधवारी सकाळपासून वसई-विरारमधील विविध 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये वसई-विरारमध्ये बांधलेल्या 41 बेकायदेशीर इमारतींवरही पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. तसेच या कारवाईची ईडीने अद्याप अधिकृतपणे कुठलीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. माजी नगरसेवक सीताराम गुप्ता हे बहुजन विकास आघाडी या पक्षाचे आहेत. त्यांच्याकडून वसई-विरारमधील वसंत नगरी परिसरातील अग्रवाल येथील सर्व्हे क्रमांक 22 ते 30 दरम्यानच्या भूखंडांवर 41 बेकायदेशीर इमारती बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे या इमारतींमध्ये बांधलेले फ्लॅट ग्राहकांना विकले होते. येथील भूखंडाचा काही भाग हा डंपिंग ग्राउंड तसेच एसटीपी प्लांटसाठी राखीव ठेवण्यात आला होता. तसेच याठिकाणची काही जमीन ही दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती.
मुख्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणा संदर्भातील, नागरिकांमार्फत घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचा तपशील देताना अनेक गंभीर अनियमितता समोर आलेल्या आहेत. त्याअंतर्गत आता ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल करून वसई-विरारमधील13 ठिकाणी छापे टाकले आहेत. सध्याच्या घडीला या प्रकरणातील आर्थिक गुंतागुंत, जमीनखरेदी व्यवहार, पैसे कोणाकडून कुठे गेले याचा सखोल तपास केला जात आहे.
जिथे बेकायदेशीर इमारती बांधल्या गेल्या आहेत त्या जमिनीच्या मालकांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून वसई-विरारमधील या इमारती पाडण्यात आल्या होत्या. यामध्ये अडीच हजारांहून अधिक लोक बेघर झाले. हाच मुद्दा लक्षात घेऊन, ईडीच्या पथकाने माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आणि या संदर्भात, ईडीने वसई विरारमधील13 ठिकाणी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.