मेहुल चोक्सीच्या उलट्या बोंबा! ‘ईडी’चे सर्व आरोप फेटाळले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेला साडेतेरा हजार कोटी रुपयांना चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने अंमलबजावणी संचलनालयाच्या नावाने उलटय़ा बोंबा मारल्या आहेत. ‘ईडी’ने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा कांगावाही चोक्सीने केला. चुकीच्या पद्धतीने आपली संपत्ती जप्त करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेला हातोहात फसवून नीरव मोदी व मेहुल चोकसी या मामाभाच्याच्या दुकलीने परदेशात पळ काढला. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून मेहुल चोक्सी हा ऑण्टिग्वामध्ये आहे. या दोघांच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज एक व्हिडीओ जारी करून मेहुल चोक्सी याने ‘ईडी’च्या नावाने आगपाखड केली. माझा पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आला. सुरक्षेचे कारण दाखवून पासपोर्ट निलंबित करण्यात आल्याने आपल्या प्रवासावर निर्बंध आल्याचा कांगावा त्याने केला. पासपोर्टचे निलंबन मागे घेण्याची विनंती आपण केली, परंतु संबंधित कार्यालयाने आपल्याला अजून कोणतेही उत्तर दिलेले नाही.

माझ्याकडून देशाच्या सुरक्षेला कोणता धोका आहे, असा उफराटा सवालही त्याने केला.