पी. चिदंबरम यांना ईडीने केली अटक, आयएनएक्स मीडिया प्रकरण

526

माजी केंद्रीय अर्थमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. आयएनएक्स मीडिया आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीच्या पथकाने त्यांची तुरुंगात जाऊन दोन तास चौकशी केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांना गुरुवारी दुपारी 3 वाजता दिल्ली न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

दिल्ली न्यायालयाने मंगळवारी ईडीला कारवाईसाठी परवानगी दिली होती. त्यानुसार ईडीच्या तीन अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास तिहार तुरुंग गाठून चिदंबरम यांची दोन तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक केली. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरच त्यांना ईडी आपल्या ताब्यात घेऊ शकणार आहे. ईडीच्या वकिलांनी दिल्ली न्यायालयाला कारवाईची माहिती देत चिदंबरम यांच्या 14 दिवस कोठडीची मागणी केली. त्यावर विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी चिदंबरम यांना गुरुवारी दुपारी 3 वाजता हजर करण्याचा आदेश दिला.

पत्नी, मुलगाही तुरुंगात धावले

चिदंबरम यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याचे समजताच त्यांचा मुलगा कार्ती आणि पत्नी नलिनी यांनीसुद्धा तिहार तुरुंगात धाव घेतली. हा सर्व चौकशीचा खेळ सुरू आहे. यामागे राजकीय षड्यंत्र आहे. हा तपास बोगस आहे, असा आरोप कार्ती यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या