पीएनबी घोटाळा; नीरव मोदीच्या दुबईमधील 11 संपत्तींवर ईडीची टाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीतील 13 हजार 500 कोटी रुपयांच्या  घोटाळय़ातील एक प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी एक धक्का दिला आहे. ईडीने मोदीच्या दुबईमधील 11 संपत्ती जप्त केल्या असून यांचे मूल्य 56 कोटी रुपये आहे. ही सर्व संपत्ती मोदी आणि त्याची ग्रुप कंपनी फायरस्टार डायमंड एफजेईईच्या नावावर आहे.

काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली (मनी लॉण्ड्रिंग ऍक्ट) ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांची 637 कोटी रुपयांच्या संपत्तीवर गेल्याच महिन्यात ईडीने जप्ती आणली होती. यामध्ये न्यूयॉर्कमधील सेंट्रॅल पार्क येथील दोन अपार्टमेंटचा समावेश आहे.

दुबईमधील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. यासाठी मुंबईतील न्यायालयाचे एक विनंतीपत्रही या अधिकाऱ्यांना मिळणार आहे. हे प्रकरण जागतिक कायद्याच्या कारवाईचा एक भाग आहे. हे पत्र मिळताच कोणत्याही आरोपीची परदेशातील मालमत्ता जप्त करता येते.

प्रत्यार्पणाचे प्रकरण इंटरपोलमध्ये अडकले

पीएनबी घोटाळय़ाप्रकरणी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांची चौकशी सीबीआय, ईडी सध्या करीत आहेत. चोक्सी, मोदीविरुद्ध मनी लॉण्ड्रिंगखाली सीबीआयने गुन्हे नोंदवल्यानंतर या दोघांविरुद्ध ईडीने केस दाखल केली आहे. या दोघांविरुद्ध ईडीने आरोपपत्रही दाखल केले आहे. याशिवाय नीरव मोदी, नीरव मोदीशी संबंधित व्यक्तींविरुद्ध इंटरपोलमार्फत नोटिसा जारी केलेल्या आहेत. मेहुल चोक्सीने ऍण्टीगुआचे नागरिकत्व घेतलेले आहे. त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण इंटरपोलमध्ये सध्या अडकलेले आहे.