खेडमधील सभेमुळे मिंधे सरकारचे धाबे दणाणले? सदानंद कदमांविरोधात ईडीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sadanand kadam

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सदानंद कदम यांची शुक्रवारी पहाटे तासाभर चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. सदानंद कदम हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये गेल्या रविवारी अतिविराट सभा झाली. या सभेनंतर मिंधे सरकारचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे त्यांनी शिवसैनिकांविरोधातील कारवायांना गती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसातच सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका पथकाने शुक्रवार पहाटे ताब्यात घेतले.

उद्योजक सदानंद कदम हे शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत. सक्तवसुली संचालनालयाने काही महिन्यांपासून सदानंद कदम यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याचे कळते आहे. दापोलीतील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्ट सोबत सदानंद कदम यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या आरोप भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संशयावरुन ही चौकशी सुरू असल्याचं कळते आहे.

शुक्रवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने उद्योजक कदम यांना कुडोशी येथील फार्म हाऊस वरून ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम यांच्यावर खेड येथील एका रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया देखील झाल्याचे समजते. त्यानंतर लगेचच सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

ही कारवाई सूडबुद्धीने!

शिवगर्जना सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केलेल्या आमदार संजय कदम यांनी मिंधे सरकारवर हल्लाबोल केला. ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकार करत आहे. त्यामुळे आज झालेल्या कारवाईचा निषेध करत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर ही कारवाई होत आहे. त्यामुळे धमकविण्याचे काम राज्य सरकार करीत असून शिंदे गटाचे काही नेते सूडबुद्धीने कारवाई घडून आणण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार संजय कदम यांनी केला आहे.