
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य काही जणांविरोधात ईडीने हे आरोपपत्र दाखल केले आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोसह अन्य कंपन्यांनी या कथित गैरव्यवहारात संशयास्पद व्यवहार केले. तोटय़ात असलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतले गेल्याचा ईडीचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण
ईडीच्या आरोपांनुसार, कन्नड सहकारी साखर कारखाना हा रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो लिमिटेडच्या मालकीचा आहे. या साखर कारखान्याचे 80.56 कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने त्यांच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या. त्यानंतर अत्यंत कमी किमतीत या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. ऑगस्ट 2019 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने याचा गुन्हा दाखल केला. त्याआधारे ईडीने याप्रकरणी तक्रार नोंदवून चौकशी सुरू केली. आता ईडीने याचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात आमदार रोहित पवार यांचे नाव आहे.