इडीच्या कारवाईत मुंबईत 91.5 किलो सोनं आणि 340 किलो चांदी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सराफा व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईत इडीच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. इडीने मुंबईमध्ये केलेल्या या कारवाईत 91.5 किलो सोनं आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. मागच्या आठवड्यात केलेल्या तपासात इडीला हे घबाड हाती लागलं आहे. मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात कारवाई सुरु असताना इडीला काही खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची तपासणी केली असता हे लॉकर नियम न पाळता चालवले जात असल्याचं इडीला आढळून आलं. लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याचं आणि कोणतंही रजिस्टर नसल्याचं इडीला आढळून आलं.

या लॉकरची झडती घेत असताना इडीला त्याठिकाणी 761 लॉकर्स आढळले. त्यातील 3 लॉकर्स मेसर्स रक्षा बुलियनचे होते. हे लॉकर्स चालवताना 2 लॉकरमध्ये इडीला 91.5 किलो सोनं आणि 152 किलो चांदी सापडली. तसेच रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त 188 किलो चांदीही सापडली. हे सर्व घबाड इडीने जप्त केलं असून याची एकूण किंमत 47.76 कोटी एवढी आहे. इडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांमध्ये शोध मोहिम केली. मेशर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीच्या संदर्भात ही शोध मोहीम होती. मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडविरुद्ध इडीने 8 मार्च 2018 ला पीएमएलए 2002 च्या तरतुदींनुसार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती.

या कंपनीवर बँकांना फसवून 2,296.58 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे. कर्जाच्या माध्यमातून मिळालेले पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून पळवून नेण्यात आले. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवले गेले. या प्रकरणामध्ये कर्ज घेण्याचा हाच उद्देश नव्हता आणि अशा व्यवहारांसाठी कोणताही करार करण्यात आला नाही, असा दावा इडीने केला आहे. 2019 मध्ये इडीने एकदा 46.97 कोटी आणि 158.26 कोटी जप्त केले होते.