आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा, रुग्णालयाच्या बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप

ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पक्षाचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरासह तब्बल 13 ठिकाणी छापे टाकले. भारद्वाज यांच्यावर रुग्णालय बांधकामात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने कारवाई केली.

एसीबी अर्थात दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरापूर्वी ‘आप’ सरकारच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती. यात जूनमध्ये माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ‘एसीबी’ने हे प्रकरण ईडीकडे वर्ग केले. दरम्यान, ईडीने जुलैमध्ये हा गुन्हा दाखल केला. देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या मुद्दय़ावरून लक्ष्य दुसरीकडे वळवण्यासाठी मोदी सरकारने भारद्वाज यांच्याविरोधात कारवाई सुरू केल्याचा आरोप दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’ नेत्या अतिशी यांनी केला आहे.