ईडीचे पुन्हा धाडसत्र, अजित पवार, अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालत्तमत्तांवर छापे टाकले होते. आता ईडीने अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील सिंध सोसायटीमधील घरी धाड टाकली आहे. तर दुसरीकडे आयकर विभागाकडून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांच्या कर्जाबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जगदीश कदम हे पुणे जिह्यातील दौंड शुगर्स या खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आहेत. ईडीने आज सकाळी जगदीश कदम यांच्या सिंध सोसायटीमधील निवासस्थानी धाड टाकून कारवाई सुरू केली. आयकर विभागाच्या धाडीनंतर निवासस्थानी काही दिवसांतच ईडीने धाड टाकल्याने खळबळ उडाली. त्याचप्रमाणे हातगाव, उमरी येथील आयकर विभागाची कारवाई थेट अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जासंदर्भात करण्यात आली आहे. सुभाष शुगर हातगाव, एम व्ही शुगर उमरी आणि भाऊराव शुगर 1, भाऊराव शुगर 2 हे नांदेड येथील चार कारखाने आहेत. या कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.

राजकीय द्वेषातून कारवाई

आयकर विभागाकडून होत असलेली कारवाई राजकीय द्वेषातून असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठीचं मतदान तोंडावर आल्याने राजकीय भूमिकेतून ही कारवाई होत असल्याचा आरोपदेखील अशोक चव्हाण यांनी केला. ते कुणाचे व्यक्तिगत कारखाने नाहीत, सहकारी साखर कारखाने आहेत, असे चव्हाण म्हणाले.