
महाराष्ट्राला गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची परंपरा आहे. त्याच पठडीतले काम भय्यू महाराज करीत. भय्यू महाराजांनी एक सूर्योदय परिवार स्थापन केला होता. त्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी मोठे काम उभे केले. सरकार कुचकामी ठरले तिथे महाराजांच्या सूर्योदयाची किरणे पोहोचली व लोकांचे जीवन त्यात उजळून निघाले. तो सूर्य आता मावळला आहे. सूर्योदय रोजच होईल, पण ती किरणे गरीबांच्या घरापर्यंत पोहोचतील काय? भय्यूजी महाराजांचे स्मरण त्या अर्थाने सदैव होत राहील.
भय्यू महाराज हे जग सोडून गेले आहेत. त्यांनी स्वतःच जीवनयात्रा संपवली. ‘‘आपण खूप थकलो आहोत म्हणून सोडून जात आहोत’’ असे त्यांनी सांगितले. लाखो लोकांच्या जीवनात जगण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा निर्माण करणाऱ्या भय्यू महाराजांचे जीवन नैराश्याने ग्रासले होते. त्यांच्या सदैव हसतमुख चेहऱ्यामागे एक वेदना होती. त्या वेदनेचा स्फोट झाला व त्यातच भय्यूजींचा जीवन प्रवास संपला. महाराष्ट्रात लाखो शेतकरी निराश होऊन आत्महत्या करीत आहेत. दुष्काळ, नापिकी, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो व त्याची कुटुंबे उघड्यावर पडतात. या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, आत्महत्या हा मार्ग नाही, असे सांगणाऱ्या भय्यूजींनीच आत्महत्या करावी हे धक्कादायक आहे. भय्यूजींच्या मागे ‘संत’ किंवा ‘महाराज’ ही उपाधी लावणाऱ्यांनी त्यांच्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय केला. वास्तविक सामाजिक कार्य, लोकसेवेतून खरे ‘संत’पद मिळत असते. भय्यूजी हे ‘बुवा’बाजी करीत नव्हते. इतर बाबांप्रमाणे ते हवेतून अंगारे, धुपारे काढत नव्हते. हवेतून सोन्याच्या अंगठ्या वगैरे काढून श्रीमंत भक्तांना देत नव्हते. ते जादूटोणा, जारणमारण असले भंपक प्रकारही करीत नव्हते आणि चमत्कारावर त्यांचा विश्वास नव्हता. महाराष्ट्राला गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची परंपरा आहे.
त्याच पठडीतले काम
भय्यू महाराज करीत. भय्यू महाराजांनी एक सूर्योदय परिवार स्थापन केला होता. त्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी मोठे काम उभे केले. असंख्य अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. खामगाव तालुक्यात त्यांनी ७०० मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का कायमचा लागला आहे. पारध्यांच्या मुलांनी परंपरागत गुन्हेगारी व्यवसायात न जाता शिक्षण घ्यावे व मुख्य प्रवाहात यावे यासाठी त्यांनी मोठे काम सूर्योदयाच्या माध्यमातून उभे केले. त्यांनी आश्रमशाळा चालवल्या, बालसुधारगृहे चालवली, एड्सग्रस्त मुलांचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप मोठा होता व हे सर्व पुढे नेण्यासाठी पैशांची जमवाजमव कशी करावी या विवंचनेत ते सदैव होते. भय्यूजी महाराजांचे जीवन हे अनेकरंगी होते व ते रंग त्यांनी कधीच लपवले नाहीत. त्यांच्या अवतीभवती राजकीय नेते, उद्योगपती, बिल्डर यांचा गोतावळा असे. ते मोठे राजकारणी तसेच श्रीमंत ठेकेदार वर्गाचे गुरू आहेत असा आरोप होत असे. मात्र असा आरोप करणाऱ्यांनी भय्यू महाराजांनी गरीब तसेच अनाथांसाठी उभे केलेले सामाजिक कार्य पाहायला हवे. भय्यूजींचे राहणीमान आलिशान होते. इतर महाराज, बुवा, संत यांच्याप्रमाणे ते अंगावर
भगवी वस्त्र परिधान करून
आणि मोठी दाढी-मिशा ठेवून किंवा जटा वाढवून वावरले
नाहीत. ते त्यांना मान्य नव्हते. माणसाने आनंदात राहावे, दुसऱ्यांना आनंद वाटावा असे जगावे व जगू द्यावे ही त्यांची धारणा होती आणि ते स्वतः त्याच पद्धतीने जगले. त्या अर्थाने ते ढोंगी नव्हते. चेहरा एक; मुखवटा वेगळा किंवा आत एक व बाहेर दुसरेच असे त्यांचे रूप नव्हते. श्रीमंतांकडून पैसे घेऊन गरीबांच्या कामात ओतावेत असे त्यांचे धोरण असावे. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असावा यासाठी नागरिकांनी आग्रह धरला होता. त्यासाठी आर्थिक तरतूद होईना तेव्हा भय्यू महाराजांनी स्वतःची शेती विकून पदरचे २२ लाख रुपये खर्च करून तुळजापूरमध्ये छत्रपतींचा पुतळा उभा केला. त्यांनी गावोगावी शाळा उभ्या केल्या, हॉस्टेल बांधली. राजकारणात व देशात ‘संकटे’ निर्माण झाली तेव्हा भय्यूजी महाराजांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. मात्र लोकांनी तेवढेच लक्षात ठेवले. खरे म्हणजे भय्यूजींचे सामाजिक कार्य त्याहून मोठे होते. कर्जबाजारी होऊन त्यांनी हे सेवाव्रत सुरूच ठेवले. सरकार कुचकामी ठरले तिथे महाराजांच्या सूर्योदयाची किरणे पोहोचली व लोकांचे जीवन त्यात उजळून निघाले. तो सूर्य आता मावळला आहे. सूर्योदय रोजच होईल, पण ती किरणे गरीबांच्या घरापर्यंत पोहोचतील काय? भय्यूजी महाराजांचे स्मरण त्या अर्थाने सदैव होत राहील.

































































