
उत्तर प्रदेशात नव्याने उद्घाटन झालेल्या एका मोबाईल कंपनीला देशात कोणी पायघड्या पसरल्या यावरून सध्या भाजप आणि समाजवादी पक्षात श्रेयवादाची हाणामारी सुरू झाली आहे. एकीकडे हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांची हत्या होत आहेत. मैनपुरीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यक्रम भाजपचे सरकार असताना उधळून लावला गेला. अशी परिस्थिती असताना मोबाईल कंपनीच्या श्रेयावर मात्र योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या टेचात दावा ठोकला आहे. पंतप्रधान व योगींनी या समारंभात आपण यूपीसाठी किती काय काय करत आहोत, हे नेहमीप्रमाणे ठोकून दिले असले तरी, वस्तुस्थिती वेगळीच आहे.
अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना या कंपनीसोबत करार झाला होता. या जुन्या सरकारांनी केलेल्या कामाच्या फिती कापण्याचे पुण्यकर्म सध्याचे सरकार पार पाडत आहे. यापूर्वीही अखिलेश यांच्या कार्यकाळात झालेल्या यमुना एक्सप्रेस वेच्या कामाचे श्रेय आणि मेट्रोच्या कामाचे श्रेय योगींनी लाटण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्याचे साधे सौजन्यही पाळले गेले नाही. अखिलेश यांनी योगी सरकाला ‘कैची सरकार’ची उपमा देत खिल्ली उडवली आहे तर अगोदर मुख्यमंत्री निवासाच्या पळवून नेलेल्या नळ-तोट्या परत आणून द्या, मगच विकासावर बोला असा प्रतिटोला भाजपकडून अखिलेश यांना लगावण्यात आला आहे. अखिलेश बाबू मुख्यमंत्री निवासातले गायब झालेले नळ किंवा तोट्या परत आणून देतील तेव्हा देतील तूर्तास त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय तरी अखिलेश बाबूंना मिळू द्या.



























































