
जिल्ह्याजिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 25 जानेवारीला कोल्हापुरातून या मोहिमेला सुरुवात होईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांचा दौरा केल्यानंतर लक्षात आले की, विद्यार्थ्यांशिवाय पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी संबंधितांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयांत यावे लागते. विशेषतः आपल्या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट द्यावी लागते.
अनेक विभागांत जाऊन अडीअडचणी मांडत त्या सोडविण्यापेक्षा उच्च व तंत्र विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱयांसमवेत विभागीय ठिकाणी सर्व संबंधित घटकांची भेट घेऊन प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्यात येईल या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक उच्च शिक्षण, संचालक कला संचालनालय, संचालक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, संचालक ग्रंथालय संचालनालय, सह संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
कोल्हापूरनंतर पुढील विभागाची लवकरच घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख कारभार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. कोल्हापूरनंतर पुढील विभागाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ येथे ही मोहीम सुरू होणार आहे.
आपल्या समस्यांसाठी मुंबईला येत असताना विद्यार्थी, शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वांनी आपल्या प्रश्नांसाठी मंत्रालयात येण्यापेक्षा मंत्रालय आपल्या विभागात आले तर ते तत्काळ आपले प्रश्न सोडवू शकते.
अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक ठिकाणी विभागनिहाय बैठका घेतल्या जाणार असून सर्वांनी या बैठकीस येत असताना आवश्यक ती कागदपत्रे आणि आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन यावे. – उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

























































