शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार- प्रा.वर्षा गायकवाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात शाळा सुरू करून नववी ते अकरावीचे वर्ग भरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपून योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणपध्दतीही सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले.