
वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोरख सानप यांनी कचऱयात वाया गेलेल्या वस्तूंचा वापर करून ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. यातून शब्दकार्ड, पाढय़ांचा पट्टा, चौदाखडीचे तोरण, शिवरायांचा द्विमिती चित्रमय इतिहास असे शैक्षणिक साहित्य साकारण्यात आले आहे. हे टाकाऊ वस्तूंपासून निर्माण झालेले दालन पाहून आतापर्यंत अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. नाशिक वैशाली वीर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख तसेच नाशिक जिह्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापक यांनी या दालनाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ, निफाड संस्थेचे संस्थापक विश्वस्थ वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले यांनी शाळेत राबवीत असलेल्या विविध शैक्षणिक नवोपक्रमांची माहिती दिली.
सानप यांनी पाण्याच्या बाटलीच्या 21 हजार झाकणांचा वापर करून आकर्षक साहित्य तयार केले आहे. कालबाह्य झालेल्या सी.डी., रिकामे खोके, काडेपेटी, पावडरचे डबे, बरण्या अशा विविध वाया गेलेल्या साहित्यांचा वापर करून कमी खर्चात आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार केले आहे.
विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने अध्ययन-अनुभव देण्यासाठी शब्दकार्ड, अक्षर मुकुट, पाढय़ांच्या पट्टय़ा, दशक-शतक माळा, शब्द डोंगर, पझल्स वाक्य बनवा, शतक पाटी, दशक खुळखुळे, चौदाखडीचे तोरण, शिवरायांचा द्विमिती चित्रमय इतिहास यांसारखे अतिशय आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले.
सानप यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर, कमी खर्चिक, टिकाऊ, मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे आहे. मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी अशा सर्व माध्यमांच्या शाळांमधून या साहित्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा. तसेच यू टय़ूब चॅनेल तयार करून इतर शिक्षकांना साहित्य तयार करण्याची प्रेरणा व माहिती द्यावी हीच अपेक्षा आहे. – वैशाली वीर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. नाशिक
























































