
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) शिक्षणासाठी पाकिस्तानात न जाण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. पाकिस्तानमधील शिक्षण संस्थांची डिग्री अवैध ठरविण्यात आली असून हिंदुस्थानात नोकरी मिळविण्यासाठी तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमधील शिक्षण ग्राह्य धरले जाणार नसल्याचे यूजीसी-एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानमधील पदवी शिक्षणाबाबत यूजीसी, एआयसीटीईने मोठा निर्णय जाहीर केला आहे. हिंदुस्थानातील किंवा परदेशातील विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमधून शिक्षण घेतले असल्यास त्यांना हिंदुस्थानात पुढील शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणार नाहीत. काही दिवसांपूर्वी यूजीसी आणि एआयसीटीईने चीनमधील ऑनलाइन शिक्षणाबाबतही अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. चीनमधील विद्यापीठांतून केवळ ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेली पदवी हिंदुस्थानात ग्राह्य धरली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानमधील सर्वच अभ्यासक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
हिंदुस्थानी नागरिक असणाऱया स्थलांतरितांना सूट
हिंदुस्थानी नागरिक असलेल्या स्थलांतरितांना मात्र या मार्गदर्शक सूचनांमधून सूट देण्यात आली आहे. स्थलांतरित नागरिक आणि त्यांच्या मुलांना पाकिस्तानमधील शिक्षण संस्थेतून पदवी मिळविली असल्यास तसेच त्यांना हिंदुस्थानने नागरिकत्व प्रदान केले असल्यास असे विद्यार्थी हिंदुस्थानात नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत, मात्र त्याआधी त्यांची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सुरक्षिततेसंदर्भात चौकशी केल्यानंतरच त्यांना उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी दिली जाणार आहे.




























































