
हिंदुस्थानी जेवणात चपाती-पोळी, भाकरी हा आपल्या थाळीचा अविभाज्य भाग बनला आहे. बहुतेक घरात आजही फुलके अर्धे तव्यावर तर अर्धे गॅसवर भाजले जातात. मात्र थेट गॅसच्या बर्नरवर चपाती भाजणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. घराघरात रोज बनणारी चपाती थेट गॅसवर फुगवण्याची ही साधी कृती आहे पण या साध्या वाटणाऱ्या सवय आरोग्यास हानिकारक आहे. थेट गॅसवर भाजलेली चपाती खाल्ल्यावर शरीरात काय घडतं, ते जाणून तुम्ही थक्क व्हाल.
चपाती थेट ज्वालेवर किंवा कोळशावर भाजताना हानिकारक रसायनं तयार होतात. चुलीवर भाजलेल्या पदार्थांचा आणि गॉलब्लॅडर कॅन्सर (पित्ताशयात होणारी कर्करोगाची असामान्य वाढ)चा काहीसा संबंध आढळला आहे. त्यामुळे शक्य असेल, तर थेट गॅसवर चपाती भाजणं टाळावं.
तवा की थेट गॅस?
पूर्वी लोक चपाती तव्यावर कपड्याने दाबून पूर्ण शिजवायचे. त्यामुळे चपाती समतोल भाजत असे आणि थेट ज्वालेचा संपर्क टळत असे. आज मात्र वेळ वाचवण्यासाठी बहुतांश घरात चपाती थेट गॅसवर भाजली जाते. त्यामुळे कधी कधी चपातीचा काही भाग करपतो, काळा होतो आणि त्यात धोकादायक अॅक्रिलामाइड रसायन तयार होऊ शकतं.अॅक्रिलामाइड हे एक रसायन आहे, जे भाजण्याच्या प्रक्रियेदरम्यान नैसर्गिकरीत्या तयार होते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते.
फक्त चपातीच नाही तर…
मांस, मासे किंवा बटाट्यासारखे स्टार्चयुक्त पदार्थ जेव्हा थेट आगीवर किंवा जास्त तापमानावर भाजले जातात, तेव्हाही कॅन्सरकारक घटक तयार होतात. थेट गॅसवर चपाती शिजवल्याने जळलेली किंवा करपलेली पोळी खाल्ल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी म्हणून तव्यावर हळूहळू शिजवलेली चपाती खाणं जास्त सुरक्षित ठरेल.