जोगेश्वरीत कावड यात्रेवर अंडी फेकली; भाविकांमध्ये प्रचंड संताप

जोगेश्वरीत कावड यात्रेवर काही समाजपंटकांनी अंडी फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्यामुळे धार्मिक भावना भडकवणाऱया समाजपंटकांवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा, अशी मागणी भाविकांमधून पोलिसांकडे करण्यात आली आहे.

जोगेश्वरीत विश्व हिंदू परिषद आणि श्री खांडेश्वर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘सामाजिक समरसता’ नावाने सोमवारी ही कावड यात्रा काढण्यात आली होती. जोगश्वरी पश्चिम यादव नगर येथील हनुमान मंदिर अशी ही कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. ही कावड यात्रा दुपारी 2 वाजताच्या  सुमारास पॅप्टन सामंत मार्गावर एआरबी हाईट्स या इमारतीसमोरून जात असताना काही अज्ञातांकडून अंडी फेकण्यात आली. या प्रकारामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा

कावड यात्रेवर जवळच्या इमारतीमधून अंडी  फेकणाऱया काही संशयित महिलांना पाहिले होते. मात्र  यात्रा शांततेत पार पडावी म्हणून याकडे दुर्लक्ष केल्याचे आयोजक गोविंद बेनवंशी यांनी सांगितले. दरम्यान, आयोजकांनी केलेल्या तक्रारीनुसार अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तीव्र आंदोलन

उत्तर भारतात जुलै ते ऑगस्टमध्ये ही कावड यात्रा काढण्यात येते. यात्रेत सहभागी होणाऱयांना ‘कावडिया’ म्हणून ओळखले जाते. यात्रेच्या माध्यमातून शंकराला गंगाजल अर्पण करण्यासाठी भाविकही यात्रेत चालत असतात. अशा धार्मिक भावना असलेल्या यात्रेवर अंडी फेकणाऱयांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भाविकांनी दिला आहे.