कल्याणच्या आठ पोलीस ठाण्यांना मिळणार बळ, ‘फॉरेन्सिक व्हॅन’मुळे गुन्ह्यांचा तपास होणार अधिक फास्ट

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कल्याण पोलीस आता सज्ज झाली आहे. गुन्ह्यांचा झटपट छडा लावण्यासाठी पोलिसांची फॉरेन्सिक व्हॅन आता ‘ऑन रोड’ उतरली आहे. त्यामुळे तपास फास्ट होणार असून तपासात वेग, अचूकता व वैज्ञानिक काटेकोरपणा वाढणार आहे. ही अत्याधुनिक सेवा 24 तास उपलब्ध राहणार असल्याने कल्याण परिमंडळ तीनमधील आठही पोलीस ठाण्यांना साठी नवे बळ मिळणार आहे.

कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा, रामनगर, विष्णूनगर, मानपाडा व टिळकनगर अशा आठ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. मात्र गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी तेथील पोलिसांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. फॉरेन्सिक चाचण्या व त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी पोलीस दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. यावर तोडगा म्हणून परिमंडळ तीनतर्फे या अत्याधुनिक व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहाय्यक आणि प्रशिक्षित प्रयोगशाळा तज्ज्ञांची टीम कार्यरत असणार आहे. ही टीम भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुराव्यांच्या आधारे निदान करून पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत करणार आहे.

फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे तत्काळ आणि अचूकरीत्या संकलित करता येणार आहेत. तसेच तपास वेगवान, पारदर्शक होणार असून न्यायालयात आरोपीविरुद्ध ठोस व वैज्ञानिक पुरावे सादर करणे सोपे होणार आहे.
अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त