
काही दिवसांपूर्वीच पराठ्यांवर जीएसटी लावला जाणार असं वृत्त आलं होतं. आता यात अजून एका पदार्थाचा समावेश होणार आहे. पराठ्यानंतर आता पॉपकॉर्नवर देखील जीएसटी लागणार आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ऑथोरिटी ऑफ अॅडव्हास रूलिंग विभागाच्या गुजरात बेंचने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये विकले जाणारे रेडी टू ईट पॉपकॉर्नवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. पॉपकॉर्न बनवण्यासाठी मक्याचे दाणे, मीठ, लोणी इत्यादी गोष्टी लागतात. त्यामुळे त्याच्यावर यापुढे 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल.
यापूर्वी पराठा हा रोटी म्हणजे चपातीच्या वर्गवारीत गणला होता. मात्र यापुढे तो चपातीचा एक प्रकार म्हणून गणला जाणार नसून त्यावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. काही काळापूर्वी ऑथोरिटी ऑफ अॅडव्हान्स रूलिंगच्या कर्नाटक येथील शाखेने हे स्पष्ट केलं होतं.
एका खासगी खाद्य उत्पादक कंपनीने पराठा या खाखरा, चपाती किंवा रोटी या श्रेणीत यावा अशी मागणी केली होती. त्यावर ऑथोरिटी ऑफ अॅडव्हान्स रूलिंग (एएआर)ने आपली या श्रेणीची संकल्पना स्पष्ट केली. रोटी या श्रेणीत जे पदार्थ अंतर्भूत होतात, ते खाण्यापूर्वी संपूर्णतः शिजलेले असतात. मात्र, पराठा हा सेवनापूर्वी गरम केला जातो. त्या आधारावर पराठ्याला रोटी या श्रेणीत अंतर्भूत करता येणार नाही, असं एएआरने स्पष्ट केलं होतं. रोटी किंवा चपातीवर लागू असलेला पाच टक्के जीएसटीही त्यामुळे आता पराठ्यावर लागू होणार नाही. पराठा हा वेगळा अन्नपदार्थ म्हणून गणला जाईल आणि त्यावर 18 टक्के जीएसटी लागेल, असं एएआरने स्पष्ट केलं होतं.
























































