कोल्हापुरातील अतिप्राचीन श्री एकमुखी दत्तमंदिर

>> निळकंठ कुलकर्णी

कोल्हापूरातील एकमुखी दत्तमंदिरातील दत्ताची मूर्ती 18 व्या शतकात बनवलेली असून नृसिंहसरस्वती महाराज, श्रीपादवल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. मूळ मूर्ती उत्तर हिंदुस्थानातील असून तिची प्रतिष्ठापना कुणी केली? याची माहिती उपलब्ध नाही. पू. मौनी महाराजांनी (पाटगाव जि. कोल्हापूर ) मंदिराचा जीर्णोद्धार केला. शके १८८६ मध्ये पांडुरंग गोविंदराव भोसले आणि वर्ष 1997-98 मध्ये अमोल जाधव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मूर्तीचे वर्णन –

पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून 5 फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसऱ्या हातात कमंडलू, तिसऱ्या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात शंख अन तिसऱ्या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.

गुरुपीठ आणि मंदिर पंचायतन –

या परिवारास मंदिर पंचायतन असे संबोधले जाते. श्रीविष्णू मंदिर, नृसिंह मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर, (एकमुखी) श्री दत्त मंदिर हे पूर्ण गुरुपीठ असून अवधुतस्वरूप आहे, असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी दक्षिण बाजूस 1 सहस्त्र वर्षापूर्वीचा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षामध्ये वड, उंबर, आणि अन्य दोन वृक्ष एकाच बुंध्यातुन आले आहेत. वटवृक्ष हा दत्तमंदिराकडे झुकला आहे, तर पिंपळ वृक्ष हा दक्षिणेकडील हनुमान मंदिरावर झुकला असून त्याला पारंब्या नाहीत. पिंपळाला औदुंबराप्रमाणे फळे येतात.

शिलालेख –

दत्तमंदिरातील दत्तमूर्तीमागे असलेल्या खांबावर एक शिलालेख आहे. सध्या तो बुजवण्यात आला आहे. ओंकारेश्वर मंदिरात एक श्रीराम मंदिराच्या पायरीवर एक नृसिंह मंदिराच्या खाली भूमीत जोडलेले 2 आणि विष्णू मंदिराच्या छतावर एक असे एकूण सहा शिलालेख या मंदिरात पंचायतन परिसरात आहेत.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या