एकमुखी दत्त श्री क्षेत्र नारायणपूर

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“एकमुखी प्रभु दत्त अवतरले
नारायणपूरला स्वामी त्रैलोक्याचा आला,
सहा भुजांचे रूप मनोहर शंखचक्र ते त्रिशूल
पुष्प कमंडलू सहित श्री दत्त इथे आले ,

दर गुरुवारी भक्तही जमती
पौर्णिमेस तर होम चालती
कलियुगातील स्थान शुभंकर
निवास प्रभूंचा झाला, स्वामी त्रैलोक्याचा आला,

श्री क्षेत्र नारायणपूर

” जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता “

पुण्यापासून 30-35 कि.मी अंतरावर असलेले हे दत्तमंदिर सर्वांग सुदंर एकमुखी,षडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. सामान्यतः त्रिमूर्ती व षडभुज मूर्ती प्रचलित आहे, पण येथे ती एकमुखी आहे. त्या समोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. यथे येणारे भाविक मुख्यत्वे करून श्री सद्गुरू नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे ते सांगतात.

भक्त सासवड रोडने पुण्याच्या दक्षिणेला जाऊन दिवे घाटातून सासवडला जाऊ शकतात किंवा सातारा रोडने नारायणपूरकडे डावीकडे वळून पोहोचू शकतात. हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव आहे. या गावात जुना औदुंबर वृक्ष आहे. पुरातन शिवमंदिर हेमाडपंथी आहे. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात. सूंदर मंदिर जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पुरातन दत्त पादुका आहेत. सदर परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. सत्पुरुष श्री नारायण महाराज उर्फ अण्णा या मंदिर परिसरात राहतात. येथे काही संन्यासी साधू व उपासक आहेत.

निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरूंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे येथील दत्त जन्म सोहळा मार्गशीर्ष शु .14 सायंकाळी असतो दत्तजन्म पाळणा हलवून करतात. रात्री शोभेचे दारूकाम, दत्तजन्माचे किर्तन असते. दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेस जातात. ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते तेथे मूर्ती व गुरूपादुकांना स्नान घालतात. या मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. दत्तभक्तांच्या हा सोहळा पहाण्यासाठी महापूर लोटतो. सदर ठिकाणी अनेक दुःखी पीडित व बाधित भक्तांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे. म्हणून हे जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी आता विशालकाय मंदिर आहे पारायणाची जागा भक्त निवास व भोजनाची व्यवस्था आहे. श्री दत्तजयंती व गुरुपौर्णिमा हे येथे साजरे होणारे महत्वाचे उत्सव आहेत. येथे गुरुवार व प्रत्येक पौर्णिमेस विशेष महत्व आहे.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या