योग्य वेळ येईल, वाट पहा! राष्ट्रवादी प्रवेशावर खडसेंचे सूचक विधान

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हा मुहूर्त टळला असला तरी योग्य वेळ येईल, वाट पहा, असे थेट आणि सूचक विधान खडसे यांनी केल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

भाजपमध्ये नाराज असलेले खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या काही जवळच्या सहकाऱयांकडून खडसे हे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र खडसे यांनी आज मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त तुम्हीच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळे तो चुकला असल्याचे सांगितले. त्यावर योग्य मुहूर्त कोणता? असा सवाल पत्रकारांनी त्यांना केला असता योग्य वेळ येईल. वाट पाहा, असे सूचक विधान त्यांनी केले.

देशमुख-खडसे भेट

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख रावेर हत्याकांडातील पुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी बोरखेडा येथे आले असता खडसे हेदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. या आधी या दोन्ही नेत्यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली. मात्र या दोघांत काय चर्चा झाली याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही. देशमुख आणि खडसे भेटीमुळे पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या