
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी पक्ष बदलला, भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत गेलो, पक्षांतर केल्यामुळेच माझ्यावर ईडीमार्फत अकारण कारवाई करण्यात येत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला.
मंत्रिपदाचा गैरवापर करत कमी किमतीत पुणे, भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने ऑक्टोबर महिन्यात खडसेंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने खडसेंनी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
खडसेंच्या वतीने ऍड. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, आपला केवळ समन्सलाच नाही तर ईडीच्या ईसीआयआर प्रक्रियेलाही किरोध आहे. ईडी समन्सच्या नावाखाली केव्हाही आपल्याला अटक करेल. आपल्या डोक्यावर ईडीची टांगती तलवार कायम आहे. ऍड. पोंडा यांनी खडसे सहकार्य करत नसल्याचा ईडीचा दावाही फेटाळून लावला.































































