मिंध्यांच्या चार खंडणीखोर पदाधिकाऱ्यांना बेड्या; पाच दिवसांची पोलीस कोठडी, गोदरेज कंपनीच्या कंत्राटदाराला धमकावले

मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांच्या चार खंडणीखोर समर्थकांना खालापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खालापूरच्या गोदरेज कंपनीत खडी वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराला खंडणीसाठी धमकावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कंत्राटदा-राच्या वाहनचालकाला रस्त्यात अडवून दमदाटी करण्यात आली असून याबाबत तक्रार दाखल होताच मिंध्यांच्या या पदाधिकाऱ्यांना रात्री 12 वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने या सर्वांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तळोजा येथे राहणारा सय्यद गफार सय्यद दगडू हा खारघर येथील अशपाक खमसे यांच्या वाहनावर चालक आहे. 1 जुलै रोजी सय्यद हा खालापूरच्या मौजे तांबाटी येथील गोदरेज कंपनीत खडी भरून नेत होता. यासाठी रॉयल्टी भरलेले वाहन वजन काट्यावर वजन करीत असताना फॉर्च्यूनर गाडीतून (एम.एच.46सी व्ही 2930) आलेल्या चार गुंडांनी सय्यद यांची गाडी अडवून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. चालकाजवळची रॉयल्टीची पावतीदेखील त्यांनी हिसकावत येथे आमची दादागिरी चालते. इकडे फिरकू नको असे दरडावले. हे सर्व गुंड मिंधे गटाचे असून फॉर्च्यूनर कार ही तेजस उतेकर यांची असल्याचे समोर आले. याप्रकरणी उतेकर तसेच तांबाटी गावातील अमोल बलकवडे, योगेश शिंदे, अशोक मरागजे यांना अटक केली आहे.

कारवाई टाळण्यासाठी ‘वरून’ फोनाफोनी
कारवाई होणार हे लक्षात येताच आरोपींची एकच गाळण उडाली. यानंतर थेट खालापूर पोलीस ठाण्यात ‘वरून’ फोन खणखणले. मात्र रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दबावाला भीक न घालता अटकेची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. ही फोनाफोनी आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याचे बोलले जात आहे.