प्रासंगिक – एकवीरा चरणी कायस्थांचा मेळा…

1337

>> आनंद बेंद्रे

सी.के.पी. संस्थेच्या वतीने देशातील ज्ञातीबांधव एक दिवस एकत्रित यावा, कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन विचारांची देवाण-घेवाण व्हावी, ज्ञातीचे समाजाप्रति असलेले योगदान पुढे यावे या हेतूने सालाबादप्रमाणे यंदा 16 नोव्हेंबर (शनिवारी) ‘एक दिवस कायस्थांचा एकवीरा गडावर’ हा उपक्रम राबविला आहे. त्याची थोडक्यात ओळख…

महाराष्ट्रात जोपर्यंत जातीपातीचं राजकारण संपुष्टात येत नाही तोपर्यंत जात हा शब्द नामशेष होणार नाही. राज्यातील अनेक ज्ञातींपैकी एक ज्ञाती सी.के.पी. (कायस्थ) आहे. ‘आम्ही सी.के.पी. आहोत’ हे कुणाला सांगितले की, ऐकणारा क्षणाचाही विलंब न करता परत नक्की विचारणारच सी.के.पी म्हणजे काय?

त्यामुळे या ज्ञातीचा अर्थ उलगडून सांगणे अधिक सोयीचे होईल त्यातून (एक दिवस कायस्थांचा) हा उपक्रम समजणे सोपे जाईल.  खरं तर मासांहार ज्याला प्रिय असा चोखंदळ खवैय्या म्हणजे सी.के.पी. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हा समाज सी.के.पी. या थोडक्या रूपात जास्त ओळखला जातो. या समाजाचा मूळ पुरुष सहस्रार्जुन हा होता. सी.के.पी. हे शुद्ध राजस्व क्षत्रिय असून त्यांना 16 संस्कारांचे अधिकार प्राप्त आहेत. सहस्रार्जनाचा पुत्र चंद्रसेनपासून सी.के.पी. ज्ञाती अवतरली असे म्हणतात. (बुद्धी-निष्ठा-शौर्य) हे जसे या ज्ञातीचे प्रतीक आहे. तसेच (असि व मसि) तलवार आणि लेखणी हे ब्रीदवाक्य आहे. देशाचे संरक्षण करणारे व शिलालेख लिहिणारे ते सी.के.पी. असा उल्लेख आढळतो. सी.के.पी. समाजाला अगदी ऐतिहासिक काळापासून शौर्याची परंपरा लाभली आहे. हिंदवी स्वराज्यासाठी खिंड लढवून आपल्या प्राणांची आहुती देणारे शिवरायांचे शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे हे जातीनं सी.के.पी. त्यांचे अचाट

शौर्याचे वर्णन वीर सावरकर करतात, 

श्री बाजीने रक्त सांडीले 

खिंडीत तया काला ।।

म्हणूनी रायगडी स्वातंत्र्याचा 

थोर वृक्ष झाला ।।

तसेच वीर मुरारबाजी देशपांडे, सरसेनापती सखाराम हरी गुप्ते यांनी पेशवाईत अटकेपार भगवा झेंडा फडकविला होता. कोका प्रधान, रंगो बापूजी गुप्ते, फुलाजी प्रभू अशी ही सी.के.पी. ज्ञाती मधील थोर मंडळी.

कार्ला निवासिनी एकवीरा देवी जशी कोळी बांधवांची म्हणून सर्वश्रृत आहे तशीच ती सी.के.पी. (कायस्थ) समाजाची कुलस्वामिनी देखील आहे. याचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच किमान एक दिवस तरी सर्वदूर विखुरलेला सी.के.पी. समाज एकत्र यावा या संकल्पनेतून (एक दिवस कायस्थांचा एकवीरा गडावर) या अभिनव उपक्रमाचा जन्म झाला. या दिवशी एकवीरा गडावर अनेक धार्मिक विधी खास सी.के.पी. परंपरेने पार पडतात. पहाटे देवीची काकड आरती केली जाते. देवीची सी.के.पी. परंपरेनुसार ओटी भरून यथासांग पूजा केली जाते. सकाळी गडाच्या पायथ्याशी पायरी पुजन होऊन भक्त देवीचा जयघोष करीत गडाकडे मार्गक्रमण करतात. यंदा तर प्रथमच एकवीरा देवीची पालखी काढून ती नाचविली जाणार आहे. होम हवन, गोंधळ, भारूड हा सारा चैतन्यदायी उत्सव डोळ्यांचे पारणे फेडतो. दुपारी देवीची महाआरती झाल्यानंतर माँसाहेब मीनाताई ठाकरे सभागृहात आलेल्या भक्तांसाठी जेवणाची नाममात्र शुल्क घेऊन व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रातील बऱयाच ठिकाणाहून गडावर पोहचण्यासाठी (बसेस) वाहतूक व्यवस्था केली जाते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची गडावर एकवीरा चरणी रेलचेल असते. हळूहळू या सामाजिक उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. सी.के.पी. ज्ञाती अल्पसंख्याक असली तरी इतर सर्व जातींना सामावून घेणारी आहे. सी.के.पी. संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमात ज्ञातीमधील असंख्य स्वयंसेवकांचा उत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाटा असतो. हा दिवस म्हणजे एकवीरा चरणी कायस्थांचा मेळा असेच या विराट उत्सवाचे वर्णन करावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या