अल-निनो आणि ला-नीनाच्या प्रभावामुळे हिंदुस्थानात मान्सूनवर गंभीर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॅसिफिक महासागरातील वातावरणीय बदलांचे परिणाम हिंदुस्थानच्या मोसमी वाऱ्यांवर आणि पर्यायाने मान्सूनच्या वेळापत्रकावर होत असल्याचा खुलासा झाल आहे. अल-निनो आणि ला नीना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्थितींमध्ये काळाच्या ओघात बरेच बदल झाल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय मोसम विज्ञान संस्था अर्थात आयआयटीएमचे शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यु कोल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रसिद्ध कलेल्या एका अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. पॅसिफिक महासागरात गरम किंवा थंड पाण्यामुळे तयार होणाऱ्या अल निनो आणि ला नीना या दोन्ही स्थितींचा थेट परिणाम आशियाई हवामानावर होतो. त्यात नैर्ऋत्य मान्सूनचाही समावेश आहे. गेल्या काही दशकांत उत्तर हिंदुस्थानात बरसणाऱ्या पावसावर अल निनो आणि ला निना यांचा प्रभाव अतिशय गंभीर परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे त्या भागात बरसणाऱ्या पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. ही परिस्थिती मध्य हिंदुस्थानात मात्र दिसत नसून या भागात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. हा एक गंभीर परिणाम असून याचा परिणाम हिंदुस्थानच्या कृषी क्षेत्रावर होणार आहे.

दक्षिण हिंदुस्थनात अल निनो आणि मान्सूनच्या वेळापत्रकात समन्वय साधला गेला आहे आणि तो इतक्या वर्षांत बदललेला नाही. पण, उत्तर हिंदुस्थानात मात्र हा प्रभाव तीव्र झाला आहे. तसंच गेल्या काही दशकांत मध्य हिंदुस्थानच्या मान्सून क्षेत्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला आहे.

सर्वसामान्य स्थितीत व्यापारे वारे (ट्रेड विंड्स) हे भूमध्य रेखेसह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत राहतात. त्यामुळे समुद्राचं गरम पाणी दक्षिण अमेरिकेपासून आशियापर्यंत जातं. त्या पाण्याचं तापमान कमी करण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियेद्वारे समुद्रच्या गर्भातील थंड पाणी पृष्ठभागाच्या दिशेने वर येऊ लागतं. या प्रक्रियेमुळे ला निना आणि अल निनो नावाची वातावरणीय परिस्थिती निर्माण होते. हे वारे जेव्हा शक्तिशाली होतात, तेव्हा अधिक गरम पाणी आशियाच्या दिशेने ओढून घेऊन येतात. या पाण्याला थंड करण्यासाठी समुद्राच्या खोलातील थंड पाणी वर येतं. ही परिस्थिती अल निनो म्हणून ओळखली जाते. तर याविरुद्धची परिस्थिती ला नीना म्हणून ओळखली जाते. ला नीनामुळे मान्सून अधिक तीव्रतेने बरसतो तर अल निनोमुळे त्यात घट होते.