रागाच्या भरात सख्ख्या भावाला लोखंडी शस्राने मारहाण, पोलीस तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही वेळा मनात राग धरून केलेल्या कृतीमुळे दुसऱ्याचे नुकसान होऊ शकते. अशीच एक घटना लांजा येथे घडली आहे. शेजाऱ्यांकडून घेतलेली कुऱ्हाड आणि कोयती न सांगता आणली आणि ती परत केली नाही. ही गोष्ट सख्ख्या मोठ्या भावाला कळल्यावर त्याने या वस्तू परत देण्यास सांगितले. म्हणून मोठ्या भावाचा राग आला. त्यामुळे त्याच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने मारहाण केली. यामुळे तो  जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी वेरवली बुद्रुक येथे घडली असून पोलिसांनी या घटनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वेरवली बुद्रुक येथील सचिन शंकर अडबल (32) यांचा सख्खा लहान भाऊ रुपेश शंकर अडबल याने शेजारी राहणारे राजाराम गंगाराम अडबल यांच्या मालकीची कुऱ्हाड आणि कोयती त्यांना न सांगता घरी आणली. जेव्हा राजाराम यांना रुपेश आपल्याकडील कुऱ्हाड आणि कोयती घरी घेऊन गेला आहे हे कळले तेव्हा त्यांनी रुपेशला त्या दोन्ही वस्तू परत देण्यास सांगितले. तरीही रुपेशने त्या त्यांना परत दिल्या नाहीत. तेव्हा राजाराम यांनी रुपेशचा मोठा भाऊ सचिनला तुझा भाऊ कुऱ्हाड आणि कोयती घेऊन गेला आहे. तो परत देत नाही, ती त्याला द्यायला सांग, असे सांगितले.

शेजारी राजाराम अडबल यांच्या सांगण्यावरून सचिनने बुधवारी सकाळी 8 वाजता रुपेशला कोयती आणि कुऱ्हाड परत करण्यास सांगितले. तरीही रुपेश ऐकला नाही, उलट त्याला सचिनचा खूपच राग आला. या रागाच्या भरात त्याने घराच्या अंगणात सचिनला मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगणात पडलेल्या लोखंडी शस्त्राने रुपेशने त्याच्या भावाच्या डोक्यावर डाव्या बाजूला लोखंडी शस्त्राने वार केले. या मारहाणीमुळे सचिनच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो जखमी झाला.

जखमी अवस्थेतच सचिनने लांजा पोलीस स्थानकात त्याचा सख्खा भाऊ रुपेश अडबल याच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी रुपेश अडबल याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.