
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. काही इमारतींना आठवडाभरापासून पाण्याचा एकही थेंब मिळत नसल्याने आज उद्रेक झाला. प्यायला पाणी नाही, अंघोळीला नाही, प्रातर्विधीलाही नाही, जगून काय करू, असा आक्रोश करत एका वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला. काशिनाथ सोनावणे (७६) यांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशी अनिल शिंदे यांनी तत्परता दाखवत सोनावणे यांना रोखले.
निवासी भागातील रहिवाशी तीव्र पाणीटंचाईने बेजार आहेत. एमआयडीसी कार्यालयात रोज जाऊन अधिकाऱ्यांकडे तक्रार आणि जाब विचारण्याचे सत्र सुरू आहे. मात्र अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. गुरुवारी दुपारी जय गुरुदेव सोसायटी आर.एच.-६३ येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक काशिनाथ सोनावणे यांनी घरात पाणी नसल्यामुळे संताप आणि वैतागातून आपल्या राहत्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते नीट चालू शकत नसतानाही वॉकरचा आधार घेत त्यांनी छतावर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच सोसायटीतील अनिल शिंदे यांनी तत्परता दाखवत गच्चीवर जाऊन सोनावणे यांना समजावून घेत सुरक्षितपणे खाली आणले. सोनावणे यांच्यासारखे अनेक नागरिक गंभीर पाणीटंचाईमुळे त्रस्त आहेत.
एमआयडीसी कार्यालयावर धडक
एमआयडीसी निवासी परिसरातील नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी राजू नलावडे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर धडक देत पाणीटंचाईबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळी एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बी.बी. हर्षे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. एमआयडीसी आपले पाणी मोठ्या बिल्डरांच्या निवासी प्रकल्पांकडे वळवत असल्याचा गंभीर आरोपही या वेळी नागरिकांनी केला. सोसायटीतील अॅड. मुकुंद वैद्य यांच्यासह रहिवाशांनी उद्योग मंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवासी भागातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.



























































