‘एसआयआर’च्या भीतीने वृद्ध मतदाराची आत्महत्या

मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर)च्या भीतीने पश्चिम बंगालमध्ये एका 95 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम मेदिनीपूर जिह्यातील बीरभूम येथे ही घटना घडली. गेल्या तीन दिवसांत एसआयआरच्या भीतीने झालेली ही दुसरी आत्महत्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री क्षितिज मुजुमदार हे इलामबाजार येथे त्यांच्या मुलीच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. 2002 सालापासून त्यांचे नाव मतदार यादीत सापडत नव्हते. आता होणाऱया एसआयआरमध्ये आपले नाव मतदार यादीत सापडले नाही तर आपल्याला बांगलादेशात पाठवले जाईल, अशी भीती त्यांना सतावत होती. त्यामुळे ते अतिशय तणावात होते. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

याआधी कोलकात्याजवळील पानिहारी येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आली. पुंचबिहार येथील एका शेतकऱयाने एसआयआरच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

ममतांचा भाजपवर हल्ला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेनंतर भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘एकामागोमाग एक घडणाऱया या घटना म्हणजे भाजपची पह्डापह्डी, दहशत आणि द्वेषाच्या राजकारणाचा परिपाक आहे. राजकीय हेतूने लादलेल्या या दुर्घटना सहज टाळता येण्याजोग्या होत्या. ज्यांच्यामुळे हे भीतीचे वातावरण पसरले आहे तो भाजप आणि त्यांचे समर्थक यावर बोलण्याचे धाडस दाखवतील का? गृहमंत्री याची जबाबदारी स्वीकारतील का?, असा सवाल त्यांनी केला. बंगाली नागरिकांनी घाबरून जाऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आमचे ‘माँ, माटी आणि मानुष’ सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही. देशाची सामाजिक वीण उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा अजेंडा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा ममतांनी दिला.