गरज भासल्यास पश्चिम बंगालमध्ये सर्व बूथ संवेदनशील घोषित करू – निवडणूक आयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या पथकाने राज्यात दोन दिवसांचा पाहणी दौरा केला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका स्वतंत्र, निर्भीड आणि निःपक्ष वातावरणात घेण्यासाठी गरज भासल्यास राज्यातील सर्व बूथ संवेदनशील घोषित करण्याची आयोगाची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन यांनी सांगितले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गरज भासल्यास पश्चिम बंगालमध्ये सर्व मतदारसंघ आणि सर्व बूथ संवेदनशील घोषित करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाचे उपायुक्त आणि पश्चिम बंगालचे निवडणूक प्रभारी सुदीप जैन यांनी दक्षिण आणि उत्तर बंगालमधील प्रशासनाचे अधिकारी, राज्यातील मुख्य कार्याकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यातील निवडणुकांची तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि राज्य सरकारकडून सहकार्याबाबत जैन यांनी राज्याचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाने सर्व डीएम आणि एसपी यांना दररोजचा अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील घडामोडींवर आणि कायदा सुव्यवस्थेकडे निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. निवडणुका निःपक्ष वातावरणात करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. पथकाने राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून स्वतः काही ठिकाणी पाहणी करून अहवाल तयार केला आहे.